करमाळ्याच्या विकासाची खरी बाजू जनतेसमोर आणा – ॲड. अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कार्यकाळात करमाळा विधानसभा मतदारसंघात तब्बल 3490 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून प्रत्यक्षात आणली. त्यांचा कार्यकाळ संपून वर्ष उलटून गेले तरी अनेक विकासकामे आजही सुरू आहेत, यावरूनच त्यांच्या कार्यकाळातील विकासाची प्रचिती येते. हे वास्तव सहन न झाल्याने विद्यमान आमदार गटाचे प्रवक्ते दिशाहीन वक्तव्य करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे.संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. HAM योजनेअंतर्गत विहाळ, पोंधवडी, झरे, कोंढेज व निंभोरे या दुर्लक्षित गावांतून जाणाऱ्या राजुरी ते वेणेगाव रस्त्यासाठी तब्बल 271 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे ॲड. विघ्ने यांनी सांगितले.डिकसळ पूल, कुगाव ते शिरसोडी पूल, आवाटी, राजुरी व रायगाव येथील वीज उपकेंद्रे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, दहिगाव उपसा सिंचन योजनेचे बंद नलिकेद्वारे काम, कमला भवानी मंदिर, पुरातत्व विभागामार्फत भुईकोट किल्ला दुरुस्ती तसेच समाज कल्याण, अल्पसंख्यांक व पर्यटन विभागांतून मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी ही संजयमामा शिंदे यांच्या विकासकामांची ठोस उदाहरणे असल्याचे त्यांनी नमूद केले.विद्यमान आमदारांनी मात्र गेल्या एका वर्षाच्या कालावधीत अर्थसंकल्पातून एकही नवीन रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला नाही. स्वतःचे हे अपयश झाकण्यासाठी तहसीलदारांवर हक्कभंग दाखल करणे व जनतेची दिशाभूल करणे ही संकुचित मानसिकता असल्याची टीकाही ॲड. विघ्ने यांनी केली.दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम खंडणीसाठी रोखून धरणे, जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्याचे काम न होणे, तहसील कार्यालय इमारतीसाठी आलेला निधी खर्च न करणे, नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांसाठी संजयमामा शिंदे यांनी मंजूर करून आणलेला निधी असूनही कामे सुरू न करणे, हे विद्यमान आमदारांचे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानापासून आजपर्यंत संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. विधानसभेला व आदिनाथ साखर कारखान्याला मिळालेले वाढते मतदान पाहता सर्वसामान्य जनता संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट होते, असेही ॲड. विघ्ने यांनी सांगितले.कोणतीही युती अथवा आघाडी झाली तरी माजी आमदार संजयमामा शिंदे करमाळा तालुक्याच्या राजकारणात कायम प्रभावी राहतील. त्यामुळे संजयमामांवर टीका करण्याऐवजी विद्यमान आमदारांनी आपल्या एका वर्षातील कामांचा हिशोब जनतेसमोर मांडावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केले.


