वाशिंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तानाजी झोळ कायम जिल्हाधिकाऱ्यांकडून अपील नामंजूर

करमाळा प्रतिनिध
वाशिंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तानाजी झोळ यांच्याविरोधात तीन अपत्य असल्याच्या कारणावरून सरपंचपद रद्द करण्यात यावे, असा अर्ज नवनाथ मधुकर झोळ यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दाखल केला होता. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ (१) (ज-१) अन्वये जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सदर अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तानाजी झोळ यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे. या निकालाची प्रत तहसीलदार करमाळा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
या निर्णयामुळे वाशिंबे ग्रामपंचायतीतील सध्याची प्रशासकीय रचना कायम राहणार असून ग्रामविकासाच्या कामांना गती मिळणार आहे.
*“हा गावाच्या विकास कामांचा विजय”* – तानाजी झोळ
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सरपंच तानाजी झोळ यांनी सांगितले की, वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले. त्यानंतर कोणतेही राजकारण न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन तसेच सध्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामविकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यात यश आले.
माझ्याविरोधात दाखल केलेले अपील नामंजूर होणे हा केवळ वैयक्तिक विजय नसून गावाच्या विकास कामांचा विजय आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुढील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार संजयमामा शिंदे तसेच माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली वाशिंबे गावासाठी अधिकाधिक विकासनिधी उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


