करमाळा

केम पंचायत समिती गणातून बापू नेते तळेकर भाजपकडून इच्छुक

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्यातील केम पंचायत समिती गणातून सामाजिक चळवळीतील सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेले केम गावचे बापू नेते तळेकर यांनी आगामी पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे केम परिसरातील राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या बापू तळेकर यांनी केम परिसरात जनतेचा विश्वास संपादन केला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला व तरुणांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला असून लोकसहभागातून विकासाची कामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे. विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद हीच त्यांची ओळख बनली आहे.
केम पंचायत समिती गणाच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती या मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि परिणामकारक काम करण्याचा निर्धार बापू तळेकर यांनी व्यक्त केला आहे. गावागावातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा राबवण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवून पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ केम गणातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बापू नेते तळेकर यांनी केम पंचायत समिती गणातील नागरिक, कार्यकर्ते तसेच भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ नेतृत्वाला आपल्या उमेदवारीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. “जनतेच्या सहकार्याने आणि विश्वासावर केम गणाचा सर्वांगीण विकास साधणे हाच माझा एकमेव ध्यास आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!