केत्तुर पंचायत समिती गणात ‘ॲड. अजिनाथ विघ्नेची लाट; गावोगावी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
करमाळा (प्रतिनिधी):
केत्तुर पंचायत समिती गणातून युवा व सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळख असलेले ॲड. अजिनाथ विघ्ने यांच्या उमेदवारीने निवडणूक वातावरण तापू लागले असून त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम भागातील गावोगावी सुरू असलेल्या होम टू होम संपर्कामुळे विघ्ने यांचे नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाचे प्रवक्ते असलेले ॲड. विघ्ने हे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे विश्वासू व अभ्यासू सहकारी म्हणून ओळखले जातात. वयाच्या १८व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेल्या विघ्ने यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कामाची सुरुवात केली. केत्तुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सरपंच म्हणून त्यांनी विकासाभिमुख कारभार करत सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे.
राजकारणापेक्षा समाजकार्यास प्राधान्य देत त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला. माजी मंत्री स्व. दिगंबरमामा बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप व आमदार नारायण आबा पाटील यांच्यासोबत काम करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
उत्कृष्ट वक्तृत्व, युवक संघटन कौशल्य आणि अभ्यासू दृष्टिकोन ही त्यांची बलस्थाने मानली जातात. संजय गांधी निराधार योजना अशासकीय सदस्य तसेच विविध समित्यांवर काम करत त्यांनी प्रशासनाचा अनुभव घेतला आहे. २०१२ साली पंचायत समिती निवडणुकीत अल्पमताने पराभव झाला असला तरी त्यांनी कधीही खचून न जाता दुप्पट जोमाने सामाजिक कार्य सुरू ठेवले.
रेल्वे थांबा, रस्ते, पूल, पाणी, वीज आणि राष्ट्रीयकृत बँकेसाठी केलेला त्यांचा संघर्ष आजही मतदारांच्या लक्षात आहे. यावेळी केत्तुर पंचायत समिती गणातून सर्वसाधारण जागेवरून ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ‘विघ्ने लाट’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


