करमाळा अर्बन बँक शहराच्या आर्थिक विकासाचा कणा बँकेच्या उन्नतीसाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे – नासिर कबीर
करमाळा प्रतिनिधी
करमाळा अर्बन बँक ही करमाळा शहराची आर्थिक वाहिनी असून शहराच्या आर्थिक विकासात बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी बांधवांनी बँक अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा होणारा मराठी पत्रकार दिन तसेच मकरसंक्रांतीनिमित्त करमाळा अर्बन बँक व भारतीय जनता पार्टी, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील पत्रकार हे निर्भीड व वास्तववादी पत्रकारिता करीत असून समाजाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील वास्तव, समस्या व अन्याय निर्भीडपणे मांडण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
करमाळ्यातील पत्रकारांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सत्याची बाजू मांडली असून त्यांच्या लेखणीतून समाजाला योग्य दिशा मिळत असल्याचेही देवी यांनी स्पष्ट केले. तसेच नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरावे. पदाचा वापर वैयक्तिक हितासाठी न करता जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी करावा. शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मराठी पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील पत्रकारांचा पेन, श्रीफळ, गुलाबपुष्प व करमाळा अर्बन बँकेची दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला. तसेच करमाळा नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश लावंड व उपनगराध्यक्ष अतुल फंड यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मकरसंक्रांतीनिमित्त उपस्थितांना तिळगुळ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञासेल तथा वंदेमातरम् शक्तीसेनेचे अध्यक्ष सुहास घोलप, पत्रकार अशोक मुरूमकर व प्रफुल्ल दामोदरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करमाळा अर्बन बँकेचे व्यवस्थापक प्रकाश क्षीरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास घोलप यांनी केले.
या कार्यक्रमास पत्रकार नासीर कबीर आशपाक सय्यद, अलीम शेख, दिनेश मडके, शितलकुमार मोटे ,प्रा.राजेश गायकवाड,सुहास घोलप, जयंत दळवी,अशोक मुरूमकर, प्रफ्फुल दामोदरे तुषार जाधव, विशाल परदेशी हर्षवर्धन गाडे हरीभाऊ हिरडे संजय कुलकर्णी, अंगद देवकते,संजय चौगुले,अविनाश जोशी,नागेश चेंडगे, गोपाळ वाघमारे तसेच भाजपचे पदाधिकारी, करमाळा अर्बन बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


