महाराष्ट्रातील महानगरपालिकांतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा करमाळ्यात भारतीय जनता पार्टीचा जल्लोष*

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील मुंबई, सोलापूरसह सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम व कर्तव्यदक्ष नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल करमाळा येथे मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. विद्यानगर येथील मध्यवर्ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात हा आनंदोत्सव पार पडला.
या वेळी भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल, करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, संचालक सतीश बापू निळ, कल्याण सरडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, रेवणनाथ निकत, स्वप्निल गोडगे, वांगी सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. विजय रोकडे, महादेव गायकवाड, प्रदीप वाघमोडे तसेच उंदरगावचे सरपंच व सरचिटणीस श्री. युवराज मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपला महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. यावेळी “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला सलाम” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख धोरणांवर, पारदर्शक प्रशासनावर व सक्षम नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे व जनतेच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे.
भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने या विजयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला असून, आगामी काळातही जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी भाजप कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


