करमाळा

अहिल्यानगर महानगरपालिकेत पै.गणेश पुंडलिक भोसले यांची बहुमताने सहाव्यांदा नगरसेवकपदी निवड*

करमाळा प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी आमचे साडु बंधु पै.गणेश पुंडलिक भोसले यांची बहुमताने सहाव्यांदा निवड झाली. त्यांच्या या विजयामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त होत असून नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सातत्यपूर्ण जनसंपर्क, विकासकेंद्री भूमिका आणि समाजकारणाची भक्कम पार्श्वभूमी यामुळे भोसले यांनी नगरसेवक म्हणून विश्वासार्ह नेतृत्व उभे केले आहे.
पै गणेश भोसले यांनी नगरसेवक उपमहापौर गटनेता म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात प्रशासनाशी समन्वय साधत शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सभागृहातील अभ्यासपूर्ण भूमिका आणि नागरिकांच्या प्रश्नांवरील ठाम मते यामुळे ते लक्षवेधी ठरले.
भोसले आखाडाचे सर्वेसर्वा पै. गणेश भोसले यांनी सामाजिक कार्यातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. युवकांचे प्रश्न, क्रीडा चळवळ, सार्वजनिक समस्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभागामुळे त्यांचा जनसंपर्क अधिक दृढ झाला.
नगरसेवक म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी शहरातील विविध विकासकामे मार्गी लावली. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, सार्वजनिक सुविधा यांसह शहराच्या सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्यात आला. त्याचबरोबर अहमदनगरचा समृद्ध ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि तो नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अभिनव उपक्रम राबवले.
अहमदनगरचा इतिहास केवळ पुस्तकी स्वरूपात न ठेवता प्रत्यक्ष वास्तुशिल्पाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांमध्ये साकारण्यात आला. भित्तीचित्रे, चौकांचे सुशोभीकरण, शिल्पकला तसेच माहितीफलक उभारून ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख अधोरेखित करण्यात आली. या उपक्रमांमुळे नव्या पिढीला शहराचा इतिहास समजण्यास मदत होत असून शहराला वेगळी सांस्कृतिक ओळख मिळत आहे.
सहाव्यांदा मिळालेला हा विजय म्हणजे नागरिकांनी त्यांच्या कार्यावर व्यक्त केलेला विश्वास असल्याचे बोलले जात आहे. निवडीनंतर गणेश भोसले यांनी मतदारांचे आभार मानत, “अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अधिक जोमाने काम करणार,” अशी भूमिका मांडली.
गणेश पुंडलिक भोसले यांच्या या निवडीमुळे आगामी काळात अहिल्यानगरच्या विकास प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!