मांगी तलावातील पाणी आरक्षित करण्याच्या निर्णयाविरोधात एल्गार हजारो ग्रामस्थ व शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
करमाळा प्रतिनिधी
मांगी मध्यम प्रकल्पातून हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी विद्यालयासाठी सिंचन व पिण्याच्या पाण्याकरिता मांगी तलावातील पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात मांगी तलाव संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास मांगीसह तलाव लाभक्षेत्रातील हजारो शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
या संदर्भात काल (दि. १५) मांगी येथील विठ्ठल–रखुमाई मंदिरात मांगी तलाव संघर्ष समितीची सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीस मांगी व तलाव लाभक्षेत्रातील शेकडो ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी प्रा. राम शिंदे यांच्या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदविला.
दुष्काळी भागासाठी उभारलेला प्रकल्प
१९५० च्या दशकात करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी शेती व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून मांगी मध्यम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पामुळे मांगी पंचक्रोशीसह तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली असून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र हा तलाव पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
गाळामुळे क्षमता घटली
सध्या मांगी तलावात सुमारे २० टक्के गाळ साचलेला आहे. परिणामी पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरी अवघ्या दोन ते तीन महिन्यांत पाणीसाठा ४० टक्क्यांपर्यंत खाली येतो. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या भागात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, अशी माहिती संघर्ष समितीच्या सदस्यांनी दिली.
अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात
मांगी तलावावर मांगी गावासह लाभक्षेत्रातील १० ते १५ गावे, पुनवर, दोन्ही वडगाव, विविध वाड्या-वस्त्या तसेच बोरगाव सिंचन योजनेंतर्गत बारा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्यात तलावात पाणी उपलब्ध नसेल तर या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
मांगी तलावाला कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने सुरू आहेत. मात्र माजी राज्यमंत्री कै. दिगंबरराव बागल यांच्या कार्यकाळावगळता इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अशा पार्श्वभूमीवर केवळ पावसावर अवलंबून असलेल्या तलावातील पाणी अन्य ठिकाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याने संतापाची लाट पसरली आहे.
‘हा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास मांगी तलाव लाभक्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकरी आपल्या कुटुंबासह तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
चौकट :
“मांगी तलावात सध्या २० टक्के गाळ साचलेला आहे. त्यामुळे पाणी एक ते दीड महिन्यातच संपते. अशा परिस्थितीत तलावातील पाणी नेण्याचा सक्तीचा प्रयत्न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू.”
— श्री. सुजित तात्या बागल, ग्रामपंचायत सदस्य, मांगी
चौकट :
“पाण्यासारख्या जीवनावश्यक विषयाचे राजकारण होत आहे. ज्या लोकप्रतिनिधींना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी निर्णायक मतदान दिले, त्यांनी अशा अन्यायकारक जीआरला संमती कशी दिली, याचा खुलासा करावा.”
— श्री. अभिजीत वाघमोडे, पांडुरंग पाणी वापर संस्था, बिटर
या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य श्री. सुजित तात्या बागल, मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश दादा भांडवलकर, उपसरपंच नवनाथ तात्या बागल, पत्रकार प्रवीण अवचर, अभिजीत वाघमोडे, उमेश दादा बागल, अभिमान अवचर, संतोष नरसाळे, सुधाकर नरसाळे, पिंटू शेलार, राहुल जाधव, किरण बागल, दिवाण बागल, निळकंठ बागल, प्रताप बागल, महादेव अवचर, दिगंबर बागल, बाळासाहेब नलावडे, राजाभाऊ क्षीरसागर, मेजर चंद्रकांत बागल, अनिल बागल, निखिल बागल, संभाजीराजे बागल यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.


