करमाळा तालुक्यात ‘जीवनदान महाकुंभ–२०२६’ अंतर्गत केत्तुर नं 2 येथे 18 जानेवारी रोजी भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत ‘ब्लड इन निड’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत ‘जीवनदान महाकुंभ–२०२६’ या संकल्पनेतून भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन केतुर नं.२ येथील जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात करण्यात आले आहे.अशी माहिती करमाळा तालुका सेवा अध्यक्ष संतोष हंडाळ यांनी दिली आहे.हे रक्तदान शिबिर रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, सेवाकेंद्र केतूर नं. २, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या कृपाशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात येत असून, करमाळा तालुका सेवा समितीच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गरजू, अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्तपुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सध्याच्या काळात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, रक्तदानाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. या भावनेतून ‘जीवनदान महाकुंभ–२०२६’ अंतर्गत हे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये करमाळा तालुक्यातील तरुण, युवक मंडळे, सेवाभावी संस्था, महिला-पुरुष नागरिक, कर्मचारी व सर्व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येणार आहेत.
समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपणाऱ्या प्रत्येक निरोगी व्यक्तीने या पवित्र कार्यात सहभाग घ्यावा व ‘रक्तदानातून जीवनदान’ या संकल्पनेला हातभार लावावा, असे आवाहन करमाळा तालुका सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आह


