उजनी जलाशय परिसरात नरभक्षक बिबट्याचे वास्तव्य नागरिकांनी सावध रहाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळेसाहेब यांचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील तिघांना ठार मारणारा नरभक्षक बिबट्या अद्याप मोकाट असून बिबट्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून वनविभाग व करमाळा पोलीस यंत्रणेने शोध मोहिम सुरू केली असून अद्यापपर्यंत हा बिबट्या हाती लागला नाही. सध्या हा बिबट्या करमाळा तालुक्यातील सांगवी नं.३, बिटरगाव (वांगी), वांगी नं.४, ढोकरी, भिलारवाडी या ऊसाच्या व केळीच्या परिसरात फिरत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी निष्काळजीपणे फिरू नये असा सावधानतेचा इशारा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिला आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक श्री.पाडुळे यांनी म्हटले की, या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलिसांकडून या भागात विशेष पथक, अद्ययावत यंत्रणेचा वापर केला जात आहे, गेल्या १० डिसेंबर पासून या नरभक्षक बिबट्याचे वास्तव्य सांगवी नं.३, बिटरगाव (वांगी), वांगी नं.४, ढोकरी, भिलारवाडी या वांगी गावाच्या परिसरातील गावांमध्ये दिसून आले आहे. तरी देखील १३ व १४ डिसेंबर रोजी या गावाच्या शिवारात बिबट्याला प्रत्यक्षात कोणी पाहिले नाही किंवा त्याचे ठसे मिळून आले नाहीत. या भागात आलेला बिबट्या हा सतत पुढे व शक्यतो दक्षिणेकडे प्रवास करणारा प्राणी असून तो पैठण, (जि.औरंगाबाद) येथून दक्षिण दिशेने प्रवास करत करमाळा तालुक्यात वांगी परिसरातील वरील गावात आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे, परंतु सांगवी नं.३, बिटरगाव (वांगी), वांगी नं.४, ढोकरी, भिलारवाडी या गावाच्या दक्षिणेला व पूर्वेला उजनी जलाशयाचे पाणी असल्याने बिबट्या पुढे जाऊ शकला नाही. परंतू गेल्या दोन दिवसापासून त्याचे वास्तव्य आढळून आले नसल्याने वांगी नं.१ गावाच्या पूर्वेला पांगरे व सांगवी गावाच्या दरम्यान असलेल्या ओढ्यावरील बंधार्यावरून त्याने पांगरे व सांगवी गावाच्या शिवारात प्रवेश केला असण्याची दाट शक्यता आहे. तेथून पुढे तो कविटगाव, सांगवी नं.१, बिटरगाव (सांगवी) व कंदर गावाच्या शिवारात जाऊ शकतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी निष्काळजीपणे फिरू नये तसेच केळीच्या बागेमध्ये काम करणाऱ्या कामगारांची व मजुरांची केळीच्या बाग मालकांनी व व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी, असेही पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी म्हटले आहे.
