होम टु होम, फेस टु फेस प्रचारावर केत्तुर गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड. अजित विघ्ने यांचा भर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा प्रतिनिधी
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. अजित विघ्ने यांनी पारंपरिक सभांपेक्षा होम टु होम व फेस टु फेस प्रचारावर भर दिला असून, या पद्धतीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. थेट जनसामान्यांशी संवाद साधत, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न विघ्ने सातत्याने करत असल्याचे चित्र करमाळा मतदारसंघात दिसून येत आहे.
जनतेसाठी आजपर्यंत केलेली सामाजिक सेवा, विविध विकासकामांमधील सक्रीय सहभाग, तसेच स्थानिक प्रश्नांवर वेळोवेळी केलेली आंदोलने यामुळे ॲड. विघ्ने हे सर्वसामान्यांचे परिचित नाव ठरले आहे. गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर त्यांचा रोजचा संपर्क असून, ‘आपलाच माणूस’ अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
प्रचारादरम्यान प्रत्येकाशी आदराने व संयमीपणे संवाद साधणे, सर्वांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेणे ही त्यांची खास ओळख ठरत आहे. शेतकरी, युवक, महिला, व्यापारी वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत विघ्ने विकासाची आपली भूमिका मांडत आहेत. विशेषतः पाणीप्रश्न, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगार यांसारख्या मूलभूत विषयांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका मतदारांच्या पसंतीस उतरली आहे.
उत्तम वक्तृत्वशैली, मुद्देसूद मांडणी आणि अभ्यासपूर्ण भाषणामुळे प्रचारादरम्यान ते मतदारांना प्रभावीपणे आपली भूमिका पटवून देत असल्याचे दिसून येते. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट आराखडा असल्याचे ते सातत्याने अधोरेखित करत आहेत.
या सर्व बाबींच्या जोरावर मतदारांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता, ॲड. अजित विघ्ने यांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. थेट संपर्कातून विश्वास जपणारी ही प्रचारशैली निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


