Monday, February 16, 2026
Latest:
करमाळा

करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतीरोधक बसवुन व खड्डे बुजविण्याची भाजप नगरसेविका श्रीमती निर्मला गायकवाड यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने तात्काळ गतीरोधक बसवून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नगरसेविका निर्मला बाबूराव गायकवाड यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन करमाळा नगरपरिषद प्रशासनाकडे त्यांचे सुपुत्र सचिन गायकवाड यांनी दिले आहे.
करमाळा बस स्थानकाकडून अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग तसेच भवानी पेठेतून श्री कमला भवानी मंदिर कडे जाणारा रस्ता या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची सतत ये-जा सुरू असते. त्याचप्रमाणे करमाळा-अहिल्यानगर जुना बायपास रोडवरही वाहतुकीची तीव्रता वाढली आहे. परिणामी चौकात वारंवार छोटे-मोठे अपघात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. तसेच परिसरात कन्या प्रशाला व आण्णासाहेब हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
नगरसेविका गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात जुना बायपास रोडवरील डॉ. लावंड हॉस्पिटल समोर, श्री देवीचा रोडवरील मारुती मंदिरासमोर, भवानी पेठेकडून येणाऱ्या रस्त्यावर राखुंडे हॉटेलसमोर, एस.टी. बस स्थानकाकडून येणाऱ्या रस्त्यावर माळवे यांच्या घरासमोर तसेच दत्त पेठेकडून येणाऱ्या रस्त्यावर माने यांच्या घरासमोर गतीरोधक बसविण्याची मागणी केली आहे. याशिवाय चौकातील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या मागणीस स्थानिक नागरिकांचा पाठिंबा असून नगरपरिषद प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!