जेऊर येथे आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत एसटी आगारप्रमुखांची शनिवारी बैठक
जेऊर प्रतिनिधी
जेऊर (ता. करमाळा) : करमाळा मतदारसंघातील वाढत्या दळणवळण समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जेऊर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक आमदार कार्यालयात पार पडणार असून प्रवासी, पालक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस करमाळा आगारप्रमुख विरेंद्र होनराव, कुर्डुवाडी आगारप्रमुख रत्नाकर लाड तसेच करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम उपस्थित राहणार आहेत. करमाळा मतदारसंघातील खाजगी शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळांचे प्रतिनिधी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
करमाळा व माढा तालुक्यातील नागरिकांकडून एसटी बससेवेबाबत अनेक तक्रारी येत आहेत. काही मार्गांवर बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी आवश्यक बससेवा मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी नियमित आणि वेळेवर बससेवा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक बनले आहे.
दरम्यान, आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून करमाळा आगारास दहा तर कुर्डुवाडी आगारास दहा नवीन बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखी नवीन बसेस मंजूर करण्याची मागणीही त्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
करमाळा व कुर्डुवाडी आगारांचे नुतनीकरण करण्यात आले असून जेऊर येथील नवीन बसस्थानकाचे काम सध्या वेगात सुरू आहे. तरीदेखील काही मार्गांवरील बससेवा बंद असल्याने, विशेषतः करमाळा बसस्थानकाहून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या बंद झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीत प्रवासी व पालकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा आमदार पाटील यांचा मानस आहे. त्यामुळे संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन आमदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


