Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

वाशिंबे ग्रामपंचायतच्या सुशोभीकरण व रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता; साडेतेरा लाखांचा निधी मंजूर – सरपंच तानाजी बापू झोळ

करमाळा. प्रतिनिधी : वाशिंबे ग्रामपंचायतीच्या सुशोभीकरण व रस्ता विकास कामांसाठी एकूण साडेतेरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून संबंधित कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती सरपंच तानाजी बाप्पू झोळ यांनी दिली.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे वाशिंबे ग्रामपंचायतीच्या या महत्त्वाच्या कामांना गती मिळाली असल्याचे सरपंच झोळ यांनी नमूद केले. संबंधित विभागाकडून कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
मंजूर निधीपैकी ग्रामपंचायत परिसराच्या सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपये तर रेल्वे पूल ते भैरवनाथ मंदिर या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी साडेआठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा रस्ता गावातील नागरिक व भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन या कामास प्राधान्य देण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे.ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरणाअंतर्गत कार्यालय परिसराची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छता व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत परिसर अधिक आकर्षक व नागरिकांसाठी सोयीस्कर होणार आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी निधी मंजुरीबद्दल समाधान व्यक्त केले असून कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या विकासकामांमुळे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव सुधारणा होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!