Monday, March 30, 2026
Latest:
Uncategorized

करमाळ्यात कै डॉ प्रदिप कुमार जाधव-पाटील जयंतीनिमित्त ५ एप्रिल रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर; किडनी, प्रोस्टेट व मुतखडा आजारांवर तज्ज्ञांकडून उपचार

करमाळा (प्रतिनिधी) – कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या जयंतीनिमित्त आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा व मॅककेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ५ एप्रिल २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. किडनीविकार, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार तसेच मुतखडा यांसारख्या गंभीर आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करणारे हे शिबिर नागरिकांसाठी मोठी संधी ठरणार आहे.
हे शिबिर रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत जाधव-पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ व किडनी ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. आनंद काशिद (M.B.B.S., D.N.B. जनरल सर्जरी, D.N.B. युरोलॉजी, जसलोक हॉस्पिटल, मुंबई) हे उपस्थित राहून रुग्णांची तपासणी, अचूक निदान व मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरामध्ये किडनी स्टोन (मुतखडा), प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, पुरुष वंध्यत्व व लैंगिक समस्या (ED & PE), लहान मुलांचे तसेच स्त्रियांचे मूत्रमार्गाचे विकार आणि मूत्रमार्गातील कर्करोग यांसारख्या विविध आजारांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत. अत्याधुनिक लेझर मशीनद्वारे मुतखडा फोडण्याची सुविधा तसेच दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपी) शस्त्रक्रिया यांसारख्या आधुनिक उपचार पद्धतींचा लाभ रुग्णांना मिळणार आहे.
याशिवाय, “मेरो बॅण्ड इमेजिंग” या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सीटी स्कॅन किंवा सोनोग्राफीमध्ये न दिसणारे मूत्राशयाचे कर्करोग प्रारंभिक अवस्थेत ओळखणे शक्य होत असून, याबाबतही शिबिरात माहिती देण्यात येणार आहे. किडनीमध्ये छिद्र न करता दुर्बिणीद्वारे मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी संजीव आल्हाट (मो. 8329459591 / 8149883515 / 9112220724) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ रोहन पाटील डॉ सौ शिवानी पाटील व आयोजकांनी केले आहे. करमाळा व परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!