Tuesday, June 30, 2026
Latest:
करमाळा

मांगी तलावाच्या पाण्यावर परकिय अतिक्रमण खपवुन घेणार नाही रश्मी दिदी बागल यांचा कडाडून विरोध गरज पडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

करमाळा : प्रतिनिधी
हाळगाव येथील कृषी महाविद्यालयासाठी मांगी तलावाचे पाणी वळविण्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ रश्मी दिदी बागल यांनी कडाडून विरोध केला आहे. मांगी तलावावर अवलंबून असलेल्या बारा गावांतील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर कोणत्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. युवा नेते दिग्विजय बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक वाटल्यास शेतकऱ्यांसह तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रश्मी दिदी बागल म्हणाल्या, की मांगी तलाव हा करमाळा तालुक्यातील बारा गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे. तलावाच्या पाण्यावर हजारो एकर शेती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे स्थानिकांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा कोणताही निर्णय अन्यायकारक ठरेल. शासनाने प्रथम स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजा आणि हक्काचा विचार करणे आवश्यक आहे.
त्यांनी सांगितले की, कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त एक टीएमसी पाणी मांगी तलावात सोडल्यास बारा गावांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. स्थानिक शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्यानंतरच हाळगाव येथील कृषी महाविद्यालयासाठी पाणी देण्याबाबत निर्णय घ्यावा. “आमच्या हक्काचे पाणी दुसरीकडे वळवून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. आमच्या ताटातील घास काढून दुसऱ्यांच्या ताटात वाढण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मांगी तलावाच्या पाण्याबाबत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून शासनाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. स्थानिकांच्या हिताला प्राधान्य देत निर्णय घेतला गेला पाहिजे. भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध असून त्यांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
मांगी तलावाचा प्रश्न हा केवळ पाणीपुरवठ्याचा नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या भवितव्याशी निगडित आहे. त्यामुळे कुकडीचे अतिरिक्त एक टीएमसी पाणी मांगी तलावात सोडून प्रथम बारा गावांतील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यात यावा. त्यानंतरच हाळगाव येथील कृषी महाविद्यालयाला पाणी देण्याचा विचार करावा. अन्यथा शेतकऱ्यांसह व्यापक लोकआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ रश्मी दिदी बागल यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!