Saturday, June 27, 2026
Latest:
Uncategorized

शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्याच्या चार तरुणांचा जागतिक पराक्रम; इलेक्ट्रिक कारचा थरारक प्रवास; १० दिवसांत ७,६८८ किमीची मोहीम यशस्वी भारतीय सैन्याकडूनही कौतुक

करमाळा | प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील चार धाडसी युवकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत लडाखमधील १७,६८८ फूट उंचीवरील चांगला दरा (Chang La Pass) हे जगातील सर्वाधिक उंचीवरील आणि अत्यंत कठीण रस्त्यांपैकी एक शिखर २-व्हील ड्राईव्ह ‘MG Windsor EV’ या इलेक्ट्रिक कारने यशस्वीरीत्या सर करून जागतिक स्तरावर करमाळ्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
या मोहिमेत शंभूराजे जगताप, संदीप सरडे, दुर्गेश चिवटे आणि ओमकार घुंगडे या चार युवकांचा सहभाग होता. विशेष म्हणजे, ज्या मार्गावर सहसा ४×४ ऑफ-रोड वाहनांनाच यश मिळते, त्या मार्गावर फ्रंट-व्हील ड्राईव्ह असलेली फॅमिली इलेक्ट्रिक कार घेऊन या युवकांनी अशक्य वाटणारे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले.
या संपूर्ण मोहिमेदरम्यान उणे ७ अंश सेल्सिअस तापमान, मुसळधार बर्फवृष्टी, निसरडे रस्ते आणि ऑक्सिजनची कमतरता अशा जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागला. शिखराजवळ पोहोचताना वाहनाची बॅटरी केवळ १२ टक्के शिल्लक होती. तरीही मुख्य चालक शंभूराजे जगताप आणि सहचालक ओमकार घुंगडे यांनी शांतपणे व कौशल्याने वाहन चालवत सुरक्षितपणे शिखर गाठले. परतीच्या प्रवासात ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग’ तंत्राचा प्रभावी वापर करून बॅटरी पुन्हा चार्ज करण्यात यश मिळवले.
या मोहिमेतील सदस्य दुर्गेश चिवटे आणि संदीप सरडे यांनी सांगितले की, “१६ हजार फुटांवरील उंचीवर ऑक्सिजनची कमतरता, श्वास घेण्यास त्रास, तीव्र डोकेदुखी आणि गोठवणारी थंडी अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र आमच्या टीमचा एकमेकांवरील विश्वास आणि जिद्दीमुळे आम्ही हा ऐतिहासिक टप्पा गाठू शकलो.”
या विक्रमी मोहिमेची तयारी जवळपास २० ते २५ दिवस सुरू होती. पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी सुरुवातीला नियोजित असलेली बाईक मोहीम रद्द करून इलेक्ट्रिक कारची निवड करण्यात आली. महाराष्ट्र ते श्रीनगर २,२०४ किमीचे अंतर अवघ्या ४१ तासांत, श्रीनगर ते लेह ५२२ किमी नॉन-स्टॉप, तर लेह ते करमाळा २,७२६ किमीचे अंतर ७१ तासांत पूर्ण करण्यात आले. पर्यटनासह एकूण सुमारे ७,६८८ किलोमीटरचा प्रवास अवघ्या १० दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण झाला.
चांगला दरा येथे पोहोचल्यानंतर तेथे तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या जवानांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या चारही युवकांचे विशेष अभिनंदन केले. फ्रंट-व्हील ड्राईव्ह इलेक्ट्रिक कार एवढ्या कठीण मार्गावर पोहोचल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
मोहीम प्रमुख शंभूराजे जगताप म्हणाले, “देशातील अनेक कठीण रस्त्यांवर वाहन चालविण्याचा अनुभव आहे. मात्र लडाखचा हा प्रवास आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ठरला. लडाख आणि काश्मीरमध्ये चार्जिंग स्टेशनची संख्या अत्यंत कमी असून त्यातील अनेक बंद आहेत. दुर्गम भागात चार्जिंग सुविधा वाढविणे ही काळाची गरज आहे.”
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत इलेक्ट्रिक वाहनांची क्षमता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणाऱ्या करमाळ्याच्या या चार युवकांनी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!