Thursday, July 16, 2026
Latest:
Uncategorized

उजनीतून तातडीने पाणी सोडा शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प व भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याची भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांची मागणी

:
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे उजनी धरणातून दहिगाव उपसा सिंचन प्रकल्पासाठी तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे आणि उजनीकाठावरील शेतकऱ्यांसाठी पूर्ववत आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी भाजपा जिल्हा युवा नेते तथा मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली आहे.
याबाबत माहिती देताना श्री. बागल म्हणाले की, जून महिना संपून जुलैचा निम्मा कालावधी उलटूनही करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक मध्यम प्रकल्प, तलाव आणि पाणीसाठे कोरडे पडले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाल्याने उजनी धरणात सध्या सुमारे ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच उजनीच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे जवळपास ७० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यामुळे उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा असताना करमाळा तालुक्याला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे श्री. बागल यांनी नमूद केले.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुटपुंज्या पावसाच्या भरोशावर खरीप पेरण्या केल्या आहेत. मात्र पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची उगवण व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे यंदा भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प व भीमा-सीना जोड कालव्यातून तातडीने पाणी सोडावे. तसेच उजनीकाठावरील शेतकऱ्यांसाठी पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा सुरू करून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी दिग्विजय बागल यांनी केली आहे.
शेतकरी आणि नागरिकांमध्ये वाढती चिंता
पावसाअभावी तालुक्यातील विहिरी, कूपनलिका आणि लहान प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!