Friday, September 11, 2026
Latest:
Uncategorized

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या सह-अध्यक्षपदी भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांची निवड करमाळा तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासाला मिळणार नवी गती

करमाळा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व ग्रामीण भागाला दर्जेदार शेत आणि पाणंद रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत सह-अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून, त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या निर्णयाअंतर्गत करमाळा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी भाजप युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही शेतरस्त्यांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करीत आहेत. विशेषतः पावसाळ्यात शेतमालाची वाहतूक करणे कठीण बनते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावोगावी शेतरस्ते विकसित करून शेतीमाल वाहतुकीसाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नियुक्तीमुळे शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार असून, प्रलंबित कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होऊन ग्रामीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
दरम्यान, दिग्विजय बागल यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, शेतकरी हिताच्या या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!