Monday, August 10, 2026
Latest:
Uncategorized

करमाळ्यात आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 16 व्या मुळव्याध शिबिराची यशस्वी सांगता जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये नाममात्र दरात तज्ज्ञ उपचार; 97 रुग्णांचा सहभाग

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या वतीने करमाळा शहरातील जाधव-पाटील हॉस्पिटल येथे 16व्या मुळव्याध (पाइल्स) संबंधी आरोग्य शिबिराची यशस्वी सांगता करण्यात आली. हे शिबिर रविवार, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मुळव्याध आजाराविषयी महाराष्ट्र राज्यात नामांकित असलेले डॉ. श्री. प्रदीप तुपेरे व त्यांच्या अनुभवी डॉक्टरांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये एकूण 97 रुग्णांनी सहभाग नोंदवला, त्यांची सखोल तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक त्या रुग्णांवर ऑपरेटिव्ह उपचार (शस्त्रक्रिया) करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, या सर्व सुविधा रुग्णांना नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्यात आल्या.

जाधव-पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रोहन पाटील यांच्या पुढाकाराने व आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर राबवण्यात आले. शिबिरादरम्यान हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका व सर्व संबंधित कर्मचारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध व सेवाभावी वृत्तीने काम करून रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा दिली.या यशस्वी उपक्रमाबाबत बोलताना डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले की, “करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात तज्ज्ञ उपचार मिळावेत, या उद्देशाने जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये भविष्यातही विविध आजारांवर आधारित आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव श्री. अभिजित पाटील, डॉ. शिवानी पाटील, श्री. अजिंक्य पाटील, श्री. तात्यासाहेब जाधव, श्री. महादेव भोसले, श्री. प्रमोद जगदाळे, तसेच श्री. राहुल जाधव व श्री. शितल पेटकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!