करमाळ्यात रविवारी ‘वसंत महोत्सव २०२६ विविध मान्यवरांचा होणार गौरव वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन; शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतिवन नामकरण सोहळा
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक श्रद्धेय वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी ‘वसंत महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे-पाटील यांनी दिली. या महोत्सवात वसंतराव दिवेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव आणि शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतिवन नामकरण सोहळा होणार आहे.वसंतराव दिवेकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणे आणि समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमातून समाजसेवा, शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन मिळणार आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजयतराव (भाऊसाहेब) शिंदे पाटील भोसले प्रमुख उपस्थितांमध्ये अंजना कृष्णा (आय.पी.एस.), डॉ. प्रचिती अक्षय पुंडे, शिल्पाताई ठोंबरे, डॉ. ए. व्ही. बेडे, रणजित माने आणि कर्नल केदार भिसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे.
या महोत्सवात वसंतराव दिवेकर स्मृती पुरस्काराने प्राचार्य मिलिंद फंड, रावसाहेब साखरे, विलासराव नाईकनवरे, रेवणनाथ आदलिंग, नेमचंद भुजबळ, मधुकर मारकड, विजयकुमार जाधव शहाजीबापु मोहोळकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच वंदना खोले, सुजाता कांबळे, परमेश्वर भोगल, सुलोचना गोरे, औदुंबर रोकडे, शिवाजी रोकडे ह.भ.प. मच्छिंद्र शिवदास अभंग यांचाही पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे. स्वच्छ देवळाली उपक्रमात सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचाही यावेळी सन्मान केला जाणार आहे.
महोत्सवातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतिवन नामकरण सोहळा. देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मृती जतन करणे आणि त्यांच्या त्यागाची प्रेरणा तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे, या दृष्टीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने वीर पिता अरविंद निलंगे, वीरमाता अनुजाताई निलंगे, डॉ. गणेश करे-पाटील, अमृत करे-पाटील, प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. कल्याणराव साळुंके अंकुर शिंदे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.समाजातील गुणवंतांचा सन्मान, सामाजिक कार्याचा गौरव आणि देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृतींचे जतन अशा विविध उपक्रमांनी हा महोत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला करमाळा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे-पाटील यांनी केले आहे.


