Sunday, November 22, 2026
Latest:
Uncategorized

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

 

करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून देणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार तथा कुंभेजचे सुपुत्र निवास कन्हेरे यांच्या ‘Prismatic Resonances’ या वैशिष्ट्यपूर्ण चित्रप्रदर्शनाचे आयोजन २३ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान नवी दिल्लीतील प्रतिष्ठित त्रिवेणी आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. करमाळा तालुक्याच्या कलावैभवासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
मानवी जीवनातील सूक्ष्म संवेदना, ग्रामीण अनुभवविश्व आणि रंगांच्या प्रयोगशील मांडणीतून स्वतंत्र कलाभाषा विकसित करणाऱ्या कन्हेरे यांच्या कलाकृतींनी अमेरिका, दुबईसह देशातील कलारसिकांचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमधील त्यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले होते. या सोहळ्यास प्रा. डॉ. गणेश करे-पाटील, कन्हेरे यांचे शिक्षक प्रा. कल्याणराव साळुंके आणि पत्रकार गजेंद्र पोळ उपस्थित होते.
‘मातीत रुजलेल्या प्रतिभेला आभाळ गवसते, तेव्हा तो केवळ कलाकाराचा गौरव नसतो; तर त्या मातीच्या सर्जनशील सामर्थ्याचा सन्मान असतो. निवास कन्हेरे यांचा कलाप्रवास ग्रामीण भागातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे,’ अशा भावना यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केल्या.
कुंभेजसारख्या ग्रामीण भागातून देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचलेली ही कलासाधना जिद्द, प्रतिभा आणि सातत्यपूर्ण परिश्रमांचे प्रतीक असून, यशकल्याणी संस्थेच्या वतीने कन्हेरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कलाप्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!