Sunday, November 22, 2026
Latest:
Uncategorized

उजनीतील AI डेटा सेंटरला विरोध अखिल भारतीय युवक काँग्रेसचा उद्या तहसीलवर धडक मोर्चा शेतकरी, मच्छीमारांच्या हितासाठी प्रकल्प रद्द करण्याची मागणी; गफुरभाई शेख यांचा आंदोलनाचा इशारा

करमाळा प्रतिनिधी
उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक शेतकरी, मच्छीमार, पर्यावरण आणि जैवविविधतेला या प्रकल्पांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत हे प्रकल्प तातडीने रद्द करावेत, या मागणीसाठी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा तहसील कार्यालयावर घेराव आंदोलन व अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस गफुरभाई शेख यांनी दिली.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव विठ्ठल वाघमारे यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांना तहसीलदार करमाळा यांच्यामार्फत याबाबतचे निवेदन सादर केले आहे. उजनी धरण परिसरात जबरदस्तीने AI डेटा सेंटर व सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांवर अन्याय करू नये, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक गावांसाठी वरदायिनी ठरले आहे. या धरणाच्या पाण्यावर शेती, मासेमारी आणि हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, उजनी धरणाच्या भीमा नगर परिसरात अमेरिकन AI डेटा सेंटर आणि ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल एक लाख ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकल्पांमध्ये हायपरस्केल AI डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, न्यूक्लियर अर्थात लघु अणुऊर्जा (SMR) पॉवर प्लांट, तरंगता सौर ऊर्जा (Floating Solar) आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या उभारणीमुळे उजनी परिसरातील नैसर्गिक पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे.
उजनी परिसरातील पक्षी, प्राणी, जलचर आणि इतर सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच भविष्यात सोलापूर जिल्ह्याच्या तापमानात १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. याचा परिणाम केवळ सोलापूर जिल्ह्यावरच नव्हे, तर आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकरी, मच्छीमार आणि छोट्या-मोठ्या लघुउद्योगांच्या उपजीविकेवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताचा विचार न करता अशा प्रकारचे मोठे प्रकल्प उभारणे अन्यायकारक आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांचे जीवनमान, पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात घालू नये. शासनाने या प्रकल्पांचे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन ते तातडीने रद्द करावेत, अशी मागणी गफुरभाई शेख यांनी केली आहे.
या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर घेराव आंदोलन व अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून उजनी धरण परिसरातील शेतकरी, मच्छीमार आणि पर्यावरणाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार आहे. प्रस्तावित प्रकल्प तातडीने रद्द न केल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गफुरभाई शेख यांनी दिला आहे.
उजनी धरण हे लाखो नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्याने या प्रकल्पाच्या विरोधात युवक काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे आता उजनी परिसरातील पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!