करमाळा तालुक्यातील 55 जिल्हा परिषद शाळांतील इंग्रजी सेमी माध्यम वर्गासाठी तालुका वाचनालय संघाकडून मिळाली पुस्तके
करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील इयत्ता 1 ली व इयत्ता 5 वी या वर्गामध्ये सेमी इंग्रजी माध्यम वर्ग मा.मनोज राऊत, गटविकास अधिकारी करमाळा यांचे सूचनेनुसार सुरू करण्यात आले आहेत. या वर्गासाठी आवश्यक असलेल्या सेमी माध्यम पुस्तकांच्या मोफत पुरवठ्याबाबत केलेल्या आवाहनाला करमाळा तालुका वाचनालय संघाच्या पदाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून वाचनालय असलेल्या गावातील 55 शाळांना व त्याअंतर्गत येणाऱ्या घटक शाळांना देखील मोफत पुस्तके पुरविण्याची हमी वाचनालय संघाने घेतली आहे. याबाबत आज केंद्रप्रमुख व तालुका वाचनालय संघ यांच्यात पंचायत समितीच्या सभागृहात मा. मनोज राऊत,गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात पुस्तकांचे वितरण गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांनी स्वीकारले.तसेच जिल्हा परिषद शाळा घोटी येथे सेमी इंग्रजी माध्यमाची पुस्तके स्वतः मोफत देण्याची जबाबदारी ग्रामस्थ या नात्याने मनोज राऊत साहेब यांनी स्वीकारली.
यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्य यांनी किमान 3 सेमी इंग्रजी माध्यमाचे संच गावातील शाळेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना शाळास्तरावर आवाहन करण्याबाबत मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना सूचित करण्यात आले आहे.उर्वरित शाळांसाठी मोफत पुस्तके पुरवठा करण्याची जबाबदारी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या परिवाराने स्वीकारली आहे.यावर्षी प्रायोगिक तत्वावर 1 ली व 5 वी चे सेमी इंग्रजी माध्यम वर्ग सुरू केले असून पुढील शैक्षणिक वर्षात याची व्याप्ती वाढविली जाणार आहे. तसेच सेमी माध्यमाची पुस्तके पुढील वर्षी मोफत स्वरूपात समग्र शिक्षा अभियानातून पुरविली जाणार आहेत..अशी माहितीही यावेळी श्री.राऊत यांनी दिली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील,यशकल्याणी चे गणेश भाऊ करे पाटील,सुजीत तात्या बागल ,विकास भोसले, भास्कर पवार, राजेंद्र तरंगे, तानाजी शिंदे, बलभिम कांबळे,मनोज ढेरे,शिवाजी ढेरे, संतोष राऊत, बाळासाहेब नलवडे ,संभाजी नाना नलवडे,विठ्ठल वरकड व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते..