करमाळा तालुक्यातील संपूर्ण युवा सेना उद्धव साहेबांच्या पाठीशीच – राहुल कानगुडे, युवा सेना तालुकाप्रमुख
करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यातील संपूर्ण युवा सेना ही उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभी असून आगामी कालावधीत करमाळा तालुक्यातील ११८ गावात युवा सेनेच्या शाखा उद्घाटन करून घर तेथे युवासैनिक तयार करणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे नूतन तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
यावेळी कानगुडे म्हणाले की, काल शिंदे गटाकडून जी नवीन पदाधिकारी निवडीची जी बातमी आली आहे त्या बैठकीला मी उपस्थित होतो असे मीडियाच्या माध्यमातून वाचनात आले. वास्तविक पाहता सदर बैठकीसाठी मी उपस्थित नव्हतो वा त्या बैठकीशी माझा काहीएक संबंध नाही. तरीही माझे नाव आले त्यामुळे मी आपणासमोर प्रामाणिकपणे खुलासा सादर करतो की, मी कालही आजही आणि उद्याही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, सुरज चव्हाण, विभागीय सचिव अक्षय ढोबळे या सर्वांनी माझ्यावर युवा सेना तालुका युवा अधिकारी या पदाची विश्वासाने दिलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडून आदित्य साहेब यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ज्या युवकांना युवा सेनेत कार्य करायचे आहे अशा युवकांनी माझ्याशी संपर्क साधावा तसेच मी ही सर्व ग्रामीण भागात स्वतः येऊन युवकांचे संघटन मजबूत करुन आदित्य साहेबांचे विचार तळागाळात पोहचविणार असल्याचे कानगुडे यांनी सांगितले आहे.
