वरकटणे हे भविष्यकाळात केळी पिकाचे हब होणार…तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे प्रतिपादन
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग (आत्मा )सोलापूर व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांच्या वतीने किसान गोष्टी कार्यक्रम अंतर्गत आज 29 ऑगस्ट 2022 रोजी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरती आयोजित परिसंवादात तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अलीकडील तीन-चार वर्षांमध्ये वरकटणे व वरकटने पंचक्रोशी मध्ये मोठ्या प्रमाणावर केळी पिकाची लागवड झालेली असून ही केळी गुणवत्तापूर्ण असल्यामुळे राज्य तसेच देशाबाहेर या केळीला मोठी मागणी आहे. त्यामुळेच वरकटणे हे गाव भविष्यकाळामध्ये केळी या पिकाचे हब बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर आत्माचे व्यवस्थापक अजयकुमार बागल, सत्यम झिंजाडे, जैन इरिगेशन सिस्टीम चे केळी तज्ञ श्री किरण पाटील, ट्रायडेंट ऍग्रो कॉम प्रायव्हेट लि. मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक दिग्विजय राजपूत , राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर, वॉटर संस्थेचे विजय पाटील, पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक प्रतीक गुरव ,आशिष लाड, सरपंच बापूसाहेब तनपुरे, उपसरपंच अनिल कोकाटे आदी उपस्थित होते.
यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम चे केळी तज्ञ किरण पाटील यांनी लागवडीपासून ते केळीची वेन होण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये केळीची कोणती – कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ट्रायडेंट ऍग्रो कॉम कंपनीचे दिग्विजय राजपूत यांनी केळीची वेण झाल्यापासून ते घड विक्रीला जाईपर्यंतच्या 4 महिन्याच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कोणती फवारणी घ्यावी ? घड आच्छादन कशाने करावे ? याविषयी मार्गदर्शन केले .डॉ. विकास वीर यांनी राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश उपस्थितांना सांगितला. यावेळी पाणी फाउंडेशन च्या वतीने नाशिकच्या सह्याद्री फार्म कंपनीवरती आधारित असलेली फिल्म दाखवण्यात आली. आभार आत्माचे व्यवस्थापक अजयकुमार बागल यांनी मानले. यावेळी राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक ,सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
