मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांचा उद्या सत्कार
करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांचा मंगळवारी (ता. ६) सायंकाळी ४ वाजता येथील विकी मंगल कार्यालय येथे भव्य नागरिक सत्कार होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री राजेश यड्रावकर, शिवसेना (शिंदे गट) नेते प्रा. शिवाजीराव सावंत, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल उपस्थित राहणार आहेत. चिवटे यांच्या या सत्काराच्या निमित्ताने बागल व पाटील हे एकाच मंचावर येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने आदिनाथ कारखान्यासाठी एकत्र काम केले जाणार आहे, असे सांगितले होते. त्यानंतर आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. हा कार्यक्रम राजकीय नसला तरी हे दोघे काय बोलणार हे पहावे लागणार आहे.
चिवटे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांनी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची निर्मिती केली होती. या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली. त्याच धर्तीवर 2019 मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करून या संघटनेचे जाळे त्यांनी राज्यभर निर्माण केले. खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी रुग्णांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सामाजिक कार्यकर्ते अरुणकाका जगताप, सुजित बागल, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, मनीष काळजे, मनोज शेजवळ, भाजपचे शंभूराजे जगताप, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ, प्राचार्य मिलिंद फंड, रमेश कांबळे, आरपीआयचे नागेश कांबळे, युवराज काकडे, राजेंद्र बारकुंड, सवितादेवी राजेभोसले, राजेंद्रसिंह राजेभोसले, सुनील नागरगोजे आदी उपस्थित राहणार आहेत.
