शेतकऱ्याच्या घामाच्या दामाला योग्य भाव न मिळाल्यास साखर आयुक्तांना परिणाम भोगावे लागणार : अतुल खूपसे-पाटील
करमाळा प्रतिनिधी
शेतकरी नावाची जात तळहाताच्या फोडाप्रमाणे, पोटच्या लेकराप्रमाणे ऊस या पिकाची जोपासना करतो. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. मात्र या कष्टाला कारखानदारांकडून योग्य किंमत मिळत नाही. जिल्ह्यातील सर्व कारखानदार शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक करतात. शेतकऱ्याच्या ऊसाला कोल्हापूरच्या धरतीवर ३ हजार १०० रुपये दर मिळालाच पाहिजे. याची सर्वस्वी जबाबदारी साखर आयुक्तांची आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती. आमच्या विनंतीचा मान न राखल्यास आयुक्तांची खुर्ची जाळायला सुद्धा आम्ही मागेपुढे बघणार नाही असा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे-पाटील यांनी बोलताना दिला.
पंढरपूर येथे जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन ऊस संघर्ष समितीची स्थापना केली. या समितीची ऊस परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दारूच्या धंद्याप्रमाणे खतांच्या कंपन्या देखील बोगस तयार झाल्या आहेत. यावर शासनाचे कोणतेच नियंत्रण नाही. विनाकारण शेतकऱ्यांच्या माथी लिंकिंग करून खते मारण्याचा प्रकार होत आहे. अवाजवी दराने आणि चढ्या दराने खत दुकानदार शेतकऱ्यांना लुटत आहेत. अशा परिस्थितीला तोंड देत शेतकरी ऊस पिकाची लागवड मोठ्या हिमतीने करतो. मात्र कारखानदार या कष्टाला अजिबात किंमत देत नाही. शेतीचा मालक उसाचा मालक शेतकरी, मात्र पिकवलेल्या पिकाचा मालक कारखानदार होतो. कारखानदारांनी शेतकऱ्यांना जगविले पाहिजे पोसले पाहिजे, मात्र इथं होतं उलटच, शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कर्ज काढून शेतकऱ्यांच्या जीवावरच कारखानदार मोठा होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला, शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य दर मिळालाच पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. यासाठी आजपासूनच आंदोलनाची सुरुवात होईल. सुरू झालेले आंदोलन कोणत्याही एका संघटनेचे नसून सर्व संघटनांचे आहे, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आहे, सर्व ऊस वाहतूकदारांचे आहे. त्यामुळे कारखानदारांच्या विरोधात जात-पात-पक्ष विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आणि आपल्या हक्काच्या ऊसाला, घामाच्या दामाला योग्य दर मिळाला पाहिजे ही जबाबदारी साखर आयुक्त यांची आहे. साखर आयुक्तांनी आमची मागणी मान्य करून कारखानदारांना आदेश दिला पाहिजे. अन्यथा साखर आयुक्तांची खुर्ची जाळायला आम्ही मागे पुढे पाहणार नसल्याचा खणखणीत इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला.
