आनंद विकणारी माणसं “
आपण रोजच पाहतो जग हे एक रहाट गाडगे आहे त्याच्या परीने ते रात्रंदिवस फिरत राहतं त्याच्यामध्ये कितीतरी अनमोल संधी येतात तो एक प्रवाह असतो हे बघा या प्रवाहामध्ये जो तरला तो तरला काही प्रवाहाबरोबर वाहात गेले त्यांनी त्या प्रवाहात त्याचा दीर्घकाळ आनंद घेतला काहींनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतला काहींनी तर अशी संधी हुकवली की नदीकिनारी घर पण दीड किलोमीटरवर गावात जाऊन नळालाच पाणी प्यायचं काय तो येडा अट्टाहास पण आपल्याला समाज घटकांमध्ये आनंद शोधावा लागतो काही वेळेला तो निसर्ग आपल्याला बहाल करतो म्हणजे डोंगरदऱ्या..झुळझुळ वाहणारा ओढा…रान पाखरं…आणि रानमेवा…सारं काही निसर्गाचं देणं काही वेळा दुकानात जाऊन कपडे दागिने इत्यादी खरेदी करून आपण परिधान केल्यावर त्यांना जो आनंद मिळतो
पण आपल्या मानव वर्गामध्ये माणुसकीच्या दृष्टिकोनातून सर्वसाधारणपणे तीन घटक पाहायला मिळतात एक प्रकृती… दुसरी संस्कृती…आणि तिसरी विकृती… तर भूक लागल्यावर घरी जाऊन जेवण करणे ही प्रकृती…आपल्या ताटात काय वाढले ते जे काही आहे त्याच्यातल्या पैकी अर्धी भाकरी दुसऱ्याला देऊन आपण अर्धपोटी राहून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आनंदी होणारा एक वेगळा विशिष्ट वर्ग त्याला म्हणायचं संस्कृती…आणि तिसरा वर्ग म्हणजे रेशन कार्ड जसे तीन रंगांचे असतात एक उच्चवर्गीय…दुसरा मध्यमवर्गीय…व तिसरा दारिद्र्य रेषेखालील…तर आता यापैकी वरचे दोन घटक झाले आणि तिसरा घटक हा दारिद्र्यरेषेखालचा सुद्धा म्हणजे दलिंद्री रेषेखालचा म्हणावा लागेल कारण का तर तो आपल्या ताटातील खाऊन दुसऱ्याच्या ताटातील पण त्याची परवा न करता ओरबाडून खाणारा वर्ग त्याला म्हणायचं विकृती…पेरणी केली शेतकरी आनंदी…पाऊस झाला काळ्या मातीतून हिरवं सोनं उगवलं शेतकरी आनंदी…तिकडे पाखरं पण आनंदी… स्वच्छंदी बागडतात सगळीकडे आनंदी आनंद…
आता बघा जरा विचार करू काही घटक असे आहेत ते फक्त आनंदच विकतात आता आपण मागील दोन मिनिटांपूर्वी कपड्याच्या दुकानात होतो अहो त्यो त्याचा धंदा आहे मोठं शोरूम आहे गिऱ्हाईक आलं काय नाही आलं काय काही फरक पडत नाही म्हणून या लेखात हे पात्र मुख्यत्वे करून घ्यायचं नव्हतं पण एक तफावत म्हणून आपल्याला बघावं लागेल कारण सेल झाला नाही म्हणून काय संध्याकाळी त्याची चूल पेटत नाही असं होत नाही पण हे तर जत्रच्या तुफान गर्दीत रात्री अकरा वाजता खांद्यावर वीस-पंचवीस फुग्यांचा गठ्ठा घेऊन आनंद विकणाऱ्या फुगेवाल्याची खबर काय तर तो फक्त दिवसभर एका दहा रुपयाच्या वडापाव वर असतो पण तमाम जनतेच्या बाळ गोपाळांना आनंदी करायचं महान कार्य करतो आणि या फुग्याच्या आनंदाचं एक वेगळे गणित आहे बघा कारण त्याच्यामुळे एक नाही दोन नाही तर एकदम तीन जण आनंदी होतात म्हणजे बघा बापाने फुगा घेतला म्हणून पोरगं खुश… हिकडं फुगा विकला गेला म्हणून फुगे विकणारा पोरगा खुश…थोड्यावेळाने फटाक करून आवाज येऊन फुगा फुटला म्हणजे तिसरा पोरगा उड्या मारायला लागला टाळ्या वाजवायला लागला म्हणजे तो खुश…असे एका फुग्यामुळे तीन जणं खुश होतात तसं बघायला गेलं तर रविवार पेठेत जाऊन होलसेल मध्ये फुगे… कामठ्या…चमकी…बेगडी कागद…खळ… स्टेपलर… इत्यादी कच्चामाल आणायचा सगळं भांडवल जमा केलं तर विक्रीची किंमत आणि भांडवल याच्यातली तफावत पाहिली तर प्रत्येक नगामागं बिचाऱ्याला 10 ते 20 रुपये सुटतात त्यासाठी रात्रभर सहकुटुंब उघड्यावर थंडी वारा निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करायचा आणि आनंद विकायचा काय हा अजब व्यवहार आहे
अन आपल्यातली काही मूर्ख ऑनलाईन पिझ्झा बर्गर मागावल्यावर 499 रुपये गुगल पे वर पेड करतात आणि या फुगेवाल्याला वीस चा पंधरा ला देण्यासाठी हो बरोबर हैं भैया असं म्हणून तोंड बारीक करून बोलताना बघणाऱ्याला पण खरोखर लाज वाटते कारण पार्किंग मध्ये यानी अल्टो पार्किंग केलेली असते ओ … असतात असे एक एक जण… भिकार्या स्वरूपाचा घटक आता अजून पाहू जत्रेमध्ये असणारे पाळणे रहाटगाडगे किंवा जत्रेनुसार किंवा सिझनेबल व्यवसाय करणारे… दिवाळीच्या पणत्या रोडवर बसून निघणारी आजीबाई किंवा आजोबा… दिवाळीला केरसुणी विकणारी मावशी…असा किती मोठा व्यवसाय आहे त्यांचा पहा आपण मूर्खपणा तिथे पण पाजळतो तेथे सुद्धा घासागीस करतो खरं पाहायला गेलं तर हे घरी स्वतः आनंदी असतीलच असं नाही पण दुसऱ्यांना आनंद देतात हे मात्र नक्की
आपण सहज संध्याकाळी चौकात पोरांना घेऊन फिरायला जातो आता खाऊ गल्ली किंवा चौपाटी हा प्रकार सगळीकडेच उदयाला आलेला आहे त्यामुळे तिथं चाट किंवा पाणीपुरीच्या गाडीवरील दृश्य जरा पॉश वाटतं पण तिथे पण आनंद उपभोक्ता येतो ती कसं हे बघा दोन लिटर दूध गवळ्यांनी दिल्यावर जे समाधान मिळत नाही ते समाधान नंतरच्या अर्धी वाटी धारं मध्ये मिळतं तसं पोटभर पाणीपुरी जरी खाल्ली तर शेवटची फ्री मध्ये मिळणारी एक सर्व्हिस पाणीपुरी किंवा थेंब भर आंबट तिखट पाणी पिल्यामुळे आनंद मिळतो तो काय वर्णावा तर थोडक्यात पहायचं झालं तर कुणाला कुठे आनंद मिळेल हे सांगता येत नाही तो फक्त शोधायला पाहिजे तसंच शाळेत बसल्यावर पण हे जे किशोरवयीन मुलं असतात पण बघा सगळीच पोर काय वात्रट किंवा सगळे काय गुणवंत असतात असा काय आपल्याला दावा करता येणार नाही परंतु त्यांचं वय हे बालिश असतं काहींना मास्तरने पुढच्या रांगेत बसवलं म्हणून आनंदी तर काही जाणून-बुजून शेवटची रांग पत्करून त्यात त्यांना आनंद सापडतो
आमच्या इथं तुळशी बागेमध्ये साधारण मंडईच्या परिसरात आपली हातगाडी लांबीला पाच फूट लांब असते तर एकाची हातगाडी चांगली दीडपट म्हणजे आठ फूट लांबीची त्याच्यावर हात गाडीच्या कडकडने 30 – 40 काचेच्या बरण्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची त्यात नाही नाही त्या प्रकाराचं लोणचं…नाव काय पण कल्पना पण केली नसेल असले लोणचे मधोमध समोर तीन छोटे रांजण त्याच्यामध्ये सुकाखार त्यामध्ये कैरी…लिंबू… आणि मिक्स असा काय तो वर्णावा थाट… खडे मीठ युक्त… तेल रहीत…व त्यात खडे मीठ टाकलेले… खाताना अवश्य जाणवणार त्यात आंबा…लिंबू…मिक्स…असे तीन प्रकार गाडीवर बोर्ड नाही फक्त तिन्ही बाजूला मोठ्या अक्षरात त्या लोणचे वाल्याचा मोबाईल नंबर एवढीच काय ती जाहिरात पण कायम त्याच्या अवतीभवती दहावीस लोकांचा गोतावळा…हमेशाचीच वर्दळ असते एवढेच काय पाच रुपयात आजकाल काय मिळतं त्यो लोणचं पण पाच रुपयाचं देतो पण गिऱ्हाईक एकदम मनातून खुश घरी जाऊन अर्धी कोर भाकर जास्त खाणार तर आनंद विकणारी माणसं अशीच असतात आता त्याचा धंदा किती मोठा आहे… टर्नओव्हर किती आहे… प्रॉफिट किती… त्याच्या किती शाखा आहेत… याचं आपल्याला काही घेणं देणं नाही पण आनंद विकतोय एवढं मात्र खरं आहे अशी कितीतरी उदाहरण दररोज आपल्याला पाहायला मिळतात पण आपण फक्त त्यात आनंद शोधला पाहिजे मग ती जत्रा असो… चौपाटी असो… खाऊ गल्ली असो… रेल्वे किंवा बस असो… किंवा सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक असो…
*****************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
