न्यू इंग्लिश स्कुल चिखलठाण शाळेच्या इतिहासातील सर्वात सर्वात मोठा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा संपन्न
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण ,ता.करमाळा येथील न्यू इंग्लिश स्कुल सध्याचे नाव श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिखलठाण येथील एस.एस.सी बॅच २००३ च्या माजी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात विद्यालयात रविवार दिनांक १६ रोजी पार पडला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या माजी विद्यार्थ्यांना शिकवण्यास असणारे त्यावेळेसचे सर्वच शिक्षक आणि शिक्षिका या मेळाव्यासाठी गावात आले असताना हे सर्व माजी विद्यार्थी त्यांच्या स्वागतासाठी गावचे वेशीजवळ हजर झाले तेथे सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांना फेटे बांधून यथोचित स्वागत करून हलगीसह आणि तोफांच्या सलामीसह गावातून सवाद्य मिरवणूक काढून शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि गावकर्यांनी केलेले हे स्वागत पाहून शिक्षक गहिवरून गेल्याचे पहावयास मिळाले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून एस.एस.सी बॅच २००३ च्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास अहुजा संपूर्ण साऊंड सिस्टिम, डायस, शालेय वर्ग खोल्यांसाठी फॅन असे एक लाख रुपयांचे किमतीचे साहित्य भेट दिले. यावेळी प्रशालेची खास आठवण म्हणून सर्व शिक्षकांना आणि माजी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी-आणि शिक्षक यांची भेट झाल्याने दिवसभर एकमेकांची विचारपूस करण्यात आणि जुन्या आठवणीना उजाळा देण्यात सर्वच जण मग्न झाल्याचे दिसून आले.या एस.एस.सी बॅच २००३ चे एकूण ९५ टक्के विद्याथी हे नोकरी,व्यावसायिक आणि शेतीच्या माध्यमातून स्वताच्या पायावरती भक्कमपणे उभा असल्याने शिक्षकांना याचा खूप अभिमान वाटला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने यांनी भूषविले तर शालेय व्यवस्थापन समितीचे संदीपबापू बारकुंड हे प्रमुख पाहुणे म्हणून तर शाळेचे आजी- माजी शिक्षक या कार्यक्रमात उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी आपली मनोगते व्यक्त केली व जुन्या आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलकंठ शिंदे व साईनाथ लोहार यांनी स्वागत सचिन मराळ,आभार प्रदर्शन रूपचंद पवार यांनी मानले.
