करमाळा तालुक्याचा बहुमान भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण अडसूळ
करमाळा प्रतिनिधी
भारतीय शिक्षण संस्थेच्या (Indian Institute of Education) अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढील पाच वर्षासाठी त्यांच्याकडे अध्यक्ष पद राहणार आहे.
नामवंत शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक यांनी भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व विकासासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ चित्रा नाईक यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र व कार्यशाळा भारतीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित केल्या जातील. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातील. श्री अरूण अडसूळ हे मुळचे करमाळा तालुक्यातील भोसे या छोट्याशा खेड्यातून शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले तसेच शैक्षणिक क्षेत्रात आपला आदरयुक्त दबदबा निर्माण करणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी ही काही काळ काम पाहिलेले आहे. त्यांच्या या निवडीने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.