आ.बबनदादाला उजनीचा अभ्यास करायला सांगणाऱ्या पाटील गटाच्या प्रवक्त्याला गावातील साध्या नळयोजनेचा तरी अभ्यास आहे का ?
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील माजी आ. नारायण पाटील गटाचे प्रवक्त्ते सुनील तळेकर यांनी माढा तालुक्याचे आमदार व जिल्ह्याचे जेष्ठ नेते मा.बबनदादा शिंदे यांच्यावर टिका करताना त्यांना व आ.संजयमामा शिंदे यांना उजनी धरणाचा अभ्यास नसल्याची टिका केली आहे यावरुन तळेकर यांच्या बुध्दीचा आणखी हवा तेवढा विकास झाला नाही असे दिसुन येते आहे.
इंदापुरला जाणारे उजनीचे पाणी जर रद्द नाही केले तर मी आमदारकीचा तत्काळ राजीनामा देऊन कोर्टाचे दार ठोठावेल असे त्यावेळी आ.बबनदादा शिंदे यांनी सरकारला सांगितले होते व त्याचाच परिणाम म्हणून तत्कालीन जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी ते पाणी रद्द करत असल्याचे शासन आदेशाचे पत्र आ.संजयमामा शिंदे यांच्या मार्फत बबनदादांना पोहोच केले होते हे वास्तव आहे असे असतानाही बालिश बुद्धीचे प्रवक्ते विनाकारण अकलेचे तारे तोडत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील गावे माढा मतदारसंघाला जोडल्यामुळे आ.बबनदादांना दुहेरी भुमिका घ्यावी लागत आहे असा आरोप तळेकर करतात हे चुकीचे आहे.कारण माढा तालुक्यातील जी ३६ गावे करमाळा तालुक्याला जोडलेली आहेत त्यांना पाणी द्यायला विरोध करणारे नारायण पाटील यांची भुमिका कोणती होती त्यावेळी हेही जरा लोकांना प्रवक्त्यांनी जगजाहीर सांगितले तर बरे होईल.
बबनदादांना आ.संजयमामांना धडे देण्याची काहीही गरज नाही कारण आ.संजयमामा शिंदे हे विकासप्रिय नेतृत्व आहे .दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भरमसाठ पैसा गोळा करून दहिगाव उपसा सिंचन योजना बंद असल्याचा पोरखळ आरोप त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावरती केला आहे. तेव्हा त्या आखुड बुध्दीच्या प्रवक्त्याला एकच सांगायचे आहे की दहिगाव उपसा सिंचन योजना ही १००% पुर्ण क्षमतेने गट-तट न बघता चालवणारे संजयमामा शिंदे आजपर्यंतचे एकमेव आमदार आहेत.
प्रवक्ते म्हणतात की, दहिगाव उपसा सिंचन योजनेची पाणी पातळी पासुनची उंची ही सिना माढा बोगद्यापेक्षा अधिक खोल आहे असे असतानाही दहिगाव उपसा सिंचन योजना पाणी नाही म्हणून बंद पडली आहे वगैरे असे आरोप करणे म्हणजे आपण डोक्यावरती पडलेले आहोत हे सिद्ध करणे आहे.
वास्तविक सिना माढा बोगद्याची पाणी सोडण्याची खोली ही सर्वात जास्त असुन जेव्हा बोगद्यातून सुटणारे पाणी बंद होते तेव्हा उजनीवर नदी सोडून कोणतीही योजना चालत नाही .मग तिथे दहिगाव उपसा सिंचन योजना कशी चालणार आहे ? याचा जरा त्या प्रवक्त्याने अभ्यास करण्याची गरज आहे ,किंबहुना ती योजना कशी चालू शकते त्यासाठी त्याने त्याच्या नेत्यामार्फत शासनाला किंवा जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांना काही टिप्स द्याव्यात व योजना चालू करून घ्यावी.
यावर्षी महाराष्ट्र शासनानेच उजनी धरणातून दरवर्षी देण्यात येणाऱ्या 3 ऐवजी 5 वेळा पाणी नदीला सोडले .त्यामुळे उजनी धरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मायनस पातळीवरती गेले हा वास्तव इतिहास असताना प्रवक्ते मात्र अमुक योजना चालू आहे, तमुक योजना चालू आहे व दहिगाव मात्र बंद आहे असे आरोप करत आहेत .सीना माढा उपसा सिंचन योजना यावर्षी 6 मे रोजी बंद पडली तर दहिगाव उपसा सिंचन योजना 12 मे रोजी बंद पडली .आज रोजी दहीगाव येथील फोरवे मध्ये पाणी येण्यासाठी नदीपात्रामधून जी रचना केलेली आहे ते पात्रच कोरडे आहे असे असताना दहिगाव उपसा सिंचन योजना चालू शकेल का किंवा यापूर्वी नारायण पाटील आमदार असताना अशी योजना चालवली गेली होती का याविषयीची माहिती प्रवक्त्यांनी जनतेला द्यावी.
