Friday, April 25, 2025
Latest:
करमाळाजलविषयक

उजनीचा एवढा अभ्यास असता तर इंदापुर येथील नियोजित उपसा सिंचन योजनेस आ. शिंदे बंधूंनी विरोध केला असता- सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी .उजनीचा एवढा अभ्यास असता तर इंदापुर येथील नियोजित उपसा सिंचन योजनेस आ. शिंदे बंधूंनी विरोध केला असता, असा हल्लाबोल माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला. उजनीचे पाणी धरणग्रस्तांसाठी राखून ठेवा, यासाठी उजनीचे दरवाजे उघडून नदीपात्रात सोडले जाणारे पाणी बंद करा अशी मागणी मा. आ नारायण पाटील यांनी केली. यावर आ. बबनदादा शिंदे यांनी टिका केली. या टिकेस आज पाटील गटाकडून उत्तर दिले. यावेळी बोलताना तळेकर म्हणाले की नदीपात्रात सोडले जाणारे पाणी व यावरील योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात याव्यात आणि उजनी धरणग्रस्तांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली असता या गोष्टीचा एवढा उहापोह करण्याची गरज नव्हती. माजी आमदार नारायण पाटील यांनी या अगोदरही उजनी पाणी परिषदेचे करमाळा तालूक्यात दहा ठिकाणी आयोजन करुन उजनी बाबत गंभीर व अभ्यासात्मक चर्चा घडवून आणली आहे. शेतकर्‍यांना जागृत करुन उजनीच्या हिताचे ठराव या पाणी परिषदेत मंजूर करुन घेतले. या प्रश्नाचा राजकीय स्वार्थासाठी कोण उपयोग करत आहे हे जनतेला ठाउक आहे. माढा मतदार संघाला पंढरपूर मतदार संघातील गावे जोडल्याने आ. बबनदादा शिंदे यांना आज दुहेरी भूमिका घ्यावी लागत आहे.उजनीचा दांडगा अभ्यास असेल तर याचे थोडे धडे त्यांनी आ. संजयमामा शिंदे यांना द्यावेत. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पाणी पट्टी व वीज बिल याच्या नावावर भरमसाठ पैसे गोळा करुनही दहिगाव उपसा सिंचन योजना बंद आहे. याचे भान ठेऊन शेतकऱ्याची बाजू घ्यावी. आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे कार्टे असा न्याय जेष्ठ नेते आ. बबनदादा शिंदे करतील असे वाटत नव्हते. दहिगाव उपसाची पाणी पातळी पासूनची उंची हि सीना-माढा बोगद्यापेक्षा अधिक खोल असतानाही दहिगाव उपसा सिंचन योजना पाणी नाही म्हणून बंद पडते. करमाळा तालुक्यातील शेतकरी हे शेतकरी नाहीत का? आ. बबनदादा शिंदे यांनी अगोदर घरातील माणसांना उजनीचे पाठ गिरवण्यास सांगावे. सोलापूर शहराला जाणाऱ्या पाण्याविषयी आपण एवढे गंभीर असता तर आज सर्वाधिक टर्म आमदार राहुनही हा प्रश्न तसाच का राहिला? इतकी वर्षे मुग गिळून गप्प का बसलात? सन 2014 मध्ये इंदापुरचे आ. दत्तात्रय भरणे व मा आ नारायण पाटील या दोघांनी सोलापूर शहरासाठी बंदीस्त पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करावा, उजनीचे पाणी नदीपात्रात सोडून वाया घालवू नये अशी मागणी सभागृहात तारांकीत प्रश्न मांडून केली होती. यावरुनच आज सोलापूर शहराला बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन शासनपातळीवर होत आहे. नारायण पाटील यांची बांधिलकी करमाळा तालूका व मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातील नागरिकांशी आहे. उर्वरित माढा तालुक्यातील विकासकामे व कारखानदारीतील शेतकऱ्याची होत असलेली फसवणुक यावर आम्हाला बोलायला भाग पाडू नये. अन्यथा इतक्या वर्षाचे जनसेवेच्या नावाखाली लपलेले स्वार्थी राजकारणाचे भांडे उघडे पडेल.उजनीच्या पाण्याविषयी, माढा तालुक्यातील सीना नदीतील बॅरेज विषयी, बोगदा व उजनी पट्ट्या मधील वीजपुरवठ्या विषयी नारायण पाटील हे आमदार असताना व नसतानाही त्यांनी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली आहेत. दहिगाव उपसा सिंचन योजना नारायण पाटील यांच्यामुळेच कार्यान्वित झाली. यामुळे आ. बबनदादा शिंदे यांनी आ. संजयमामा शिंदे यांची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न करु नये. करमाळा तालूक्याशी जरी आपले काही घेणे देणे नसले तरी कुर्डूवाडी शहर व करमाळा मतदार संघास जोडलेली माढा तालुक्यातील छत्तीस गावे यांच्या विकासाची जाणीव ठेवावी. केवळ बंधूराजांसाठी मते मागण्यापुरता या भागाचा उपयोग करु नये. माढा तालुक्यातील अनेक गावे ही आजही शेतीच्या पाण्यापासून वंचीत आहेत. याचा अभ्यास शिंदे बंधूंनी करावा. वैयक्तिक महत्वकांक्षा, कुटुंबात कारखानदारी बरोबरच राजकीय पदांचे वाटप यात करमाळा-माढा तालुक्यातील विकासाचा गाडा एकाच जागी रुतुन बसला आहे याचे दायित्व स्विकारुन आहे त्या पदावर रहावे की नाही याचा अभ्यास आता आ. शिंदे बंधूनी करावा, असा हल्लाबोल माजी आमदार नारायण पाटील गटाकडून तळेकर यांनी केला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group