आमदार संजयमामा शिंदे करमाळा तालुक्यासाठी टर्निंग पॉईंट- डॉ. विकास वीर.
विकास ही चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया असते .कोण्या एका लोकप्रतिनिधीने जादूची कांडी फिरवली आणि लगेच मतदार संघाचा कायापालट झाला असं कधीच घडत नसतं ,परंतु मतदारसंघाच्या उभारणीसाठी ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असतं. विशेषतः रस्ते, पाणी आणि वीज या बाबतीमध्ये मूलभूत आणि भविष्यकालीन नियोजन डोळ्यापुढे ठेवून लोकप्रतिनिधींनी काम करणे अपेक्षित असतं. या निकषावरती आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व अगदी कसोटीवरती उतरताना दिसते. ( कुकडी प्रकल्प, दहिगाव योजना, मांगी तलाव ,कोळगाव प्रकल्प ) पाणी आले म्हणजे प्रश्न सुटला असं नव्हे तर त्यासाठी विजेची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन आमदार शिंदे यांनी अवघ्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदारसंघात 3 नवीन सबस्टेशन बरोबरच 8 ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामाला प्राधान्य दिलेलं आहे यावरून त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय यायला हरकत नाही. एवढ्यावरच न थांबता करमाळा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गौंडरे या ठिकाणी 132 MVA क्षमतेचे मोठे सबस्टेशन होण्याच्या दृष्टीने त्यांनी पत्रव्यवहार केला असून त्याचे सर्वेक्षण शासकीय पातळीवर सध्या सुरू झालेले आहे.
रस्ते ,पाणी, वीज याबरोबरच आरोग्य हीसुद्धा अतिशय महत्त्वाची बाब आहे .याबाबतीतही आमदार शिंदे यांची दूरदृष्टी आणि दुरगामी विचार दिसतो. करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्यांनी 50 कॉट ऐवजी 100 कॉट उपलब्ध करून देण्यावरती भर दिला. एवढेच नव्हे तर त्यामध्ये 20 कॉट हे अतिदक्षता विभागाचे असणार आहेत. एवढेच नव्हे तर डिजिटल एक्स-रे मशीन ,मोफत सिझेरियन सुविधा, अस्थिव्यंग दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था, आमदार स्थानिक विकास निधीमधून रुग्णवाहिका याबरोबरच जेऊर ग्रामीण रुग्णालय सुरू करणे, त्यासाठी स्टाफची नेमणूक करणे ,करमाळा येथील अधिकारी व कर्मचारी विभाग यांच्या निवासासाठी 18 कोटी निधी मंजूर करून आणणे याबाबीमध्ये त्यांची दूरदृष्टी प्रत्ययाला येते.
करमाळा शहराच्या वैभवामध्ये भर घालण्याच्या दृष्टीनेही त्यांनी अचूक नियोजन केलेले असून सांस्कृतिक सभागृह बांधकाम, करमाळा नगरपरिषद इमारत बांधकाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी तब्बल 10 कोटी निधीची तरतूद त्यांनी करून घेतली आहे. कमलाभवानी मंदिर हे करमाळा तालुक्याची ओळख व अस्मिता. या मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी आमदार शिंदे यांनी मंजूर करून आणलेला आहे. या मंजूर निधीमधून मंदिराबरोबरच परिसराचाही चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.
कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे पूर्णत्वास गेलेले काम तसेच टेंभुर्णी ते अहमदनगर या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे केलेले हस्तांतरण, भीमा नदीपात्रावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या डिकसळ पुलाच्या कामाला 50 कोटी निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झालेली आहे. मांगी रोडवरील एमआयडीसीसाठी निधी उपलब्ध झाला असून त्यामधून रस्ते, वीज इत्यादी कामे मार्गी लागली आहेत. एमआयडीसीचे प्लॉटचे दर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.एमआयडीसीसाठी मांगी तलावातून पाणी आणण्याचे नियोजन आहे.या कामांमुळे रस्ते आणि औद्योगिक विकासातही मोलाची भर पडलेली आपल्याला दिसून येते.
शिंदे – फडणीस सरकारच्या कार्यकाळामध्ये करमाळा तालुक्याचा निधीचा ओघ कमी झाला होता. ना. अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तालुक्याचा निधी पूर्ववत सुरू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 25 कोटी, 25 15 योजनेतून 50 कोटी ,ठोक अनुदान योजनेतून 10 कोटी, तर समाज कल्याण विभागाकडून 5 कोटी असा तब्बल 90 कोटींचा निधी अवघ्या 15 दिवसांमध्ये ना.अजितदादा पवार यांच्यामुळे करमाळा तालुक्यासाठी उपलब्ध झाला आहे.1 वर्षाचा बॅकलोग या निधीमुळे भरून निघण्यास मदत होणार आहे.
पाण्याच्या बाबतीतही संजयमामा शिंदे हे करमाळा तालुक्याचे आमदार झाल्यापासून सलग 3 वर्ष कोळगाव प्रकल्प 100% भरत आहे. हे हॅट्रिक करण्याचे रेकॉर्ड धरण पूर्णत्वास गेल्यापासून अद्यापपर्यंत घडलेले नव्हते .मांगी प्रकल्प 2 वेळेस ओव्हरफ्लो झालेला आहे. तालुक्यातील कोंढेज, कुंभेज , म्हसेवाडी, पारेवाडी यासारखे मोठे तलाव सातत्याने 100% भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बारमाही पिकांची लागवड झाल्याचे आपल्याला दिसून येते. याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे नियमित सुटणारे पाणी, कुकडी प्रकल्प अंतर्गत पोंधवडी या अपूर्ण चारीचे काम पूर्ण केल्यामुळे वाढलेले क्षेत्र, मांगी प्रकल्पातून सुटणारे पाणी ,कोळगाव प्रकल्पातून देण्यात येणारे पाणी यामुळे तालुक्यामध्ये बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पट्ट्यामध्ये गुणवत्ता पूर्ण केळीचे विक्रमी उत्पादन तसेच विक्रमी भाव यामुळे लोकांच्या जीवनमानामध्ये , राहणीमानामध्ये बदल झालेला आपल्याला ठळकपणे दिसून येतो. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाचे क्षेत्र आहे.या उसाचे गाळप करण्यासाठी म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन लि. तसेच पांडे येथील विठ्ठल रिफाइंड शुगर या कारखान्यांनी शेतकऱ्यांना हातभार लावलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकूणच समृद्धीला रस्ते, वीज, कारखानदारी आणि पाणी या बाबी महत्त्वाच्या असतात आणि या प्रत्येक बाबीमध्ये आमदार संजयमामा शिंदे हे करमाळा तालुक्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलेले आपल्याला दिसून येतात.
