शेतकऱ्याचे थकीत ऊसबिल न देणाऱ्या मकाई सहकारी साखर कारखाना तत्कालीन चेअरमनसह १७ संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप उसाचे बिल शेतकऱ्यांना अद्याप दिलेले नसल्याने न्यायालयाने कारखान्याचे तत्कालीन चेअरमन दिग्विजय दिगंबर बागल यांच्यासह १७ संचालकावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आळजापूर (ता. करमाळा) येथील शेतकरी समाधान शिवदास रणसिंग यांनी थकीत ऊस बिलासंदर्भात न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने करमाळा तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून नियमानुसार मुदतीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना आजअखेर दिली नाही. त्यामुळे रणसिंग यांनी करमाळा न्यायालयात मकाई कारखान्याने गाळपास घेतलेल्या ऊस याप्रकरणी करमाळा न्यायालयाचे न्यायाधीश भार्गवी भोसले यांनी तत्कालीन चेअरमन दिग्विजय दिगंबर बागल यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील उत्तम पांढरे, महादेव गुंजाळ, नंदकिशोर भोसले, गोकुळ नलावडे, बाळासाहेब सरडे, महादेव सरडे, सुनील शिंदे, रामचंद्र हाके, धर्मराज नाळे, नितीन राख, रंजना कदम, उमा फरतडे, राणी लोखंडे, संतोष पाटील, दत्तात्रय गायकवाड, प्र. कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांच्या विरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पिकाची मोबदला रक्कम (एफआरपी)संबंधित शेतकऱ्यांना ऊस गाळपास स्वीकारल्यापासून १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय सन २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये उत्पादित केलेली साखर, बगॅस,मोलॅसिस व अन्य उपउत्पादने यांच्या विक्रीतून २६ कोटी ३२ लाख ही रक्कम आलेली असताना त्या रकमेतून ऊस बिलाची शेतकऱ्यांना रक्कम न देता त्या रकमेची इतरत्र विल्हेवाट लावली याची चौकशी करण्यात यावी, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीचे वकील म्हणून ॲड अनिल कांबळे यांनी काम पाहिले.
