22 व 23 तारखेला करमाळा तालुक्यात महायुतीच्या प्रचार सभा व रॅली होणार… राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सोमवार व मंगळवार या दिवशी प्रचार सभा व रॅली होणार आहे. या प्रचार सभा व रॅलीत आमदार संजयमामा शिंदे , भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते ,कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित राहतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना भरत अवताडे म्हणाले की, ‘महायुतीमधील भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना , रासप, आरपीआय (ए), रयत क्रांती यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करमाळा तालुक्यात खासदार निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा व रॅली होणार आहे. सोमवारी सावडी येथील नवीन मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत सभा होणार आहे. यावेळी कोर्टी व केत्तूर गणातील गावांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ ते ५ यावेळेत करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात होणाऱ्या सभेला करमाळा शहरासह पांडे, रावगाव व वीट गणातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ ते १० यावेळेत पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा संगम चौक ,सुभाष चौक, भवानी पेठ ,पोथरे नाका, जय महाराष्ट्र चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गायकवाड चौक ,केतुर नाका या मार्गे जाणार असून त्याचा समारोप जुने कोर्ट येथे होणार आहे.
मंगळवारी (ता. २३) सकाळी ९ ते १२ या वेळेत कंदर येथील साई कृपा मंगल कार्यालय येथे सभा होणार आहे. यावेळी केम व वांगी गणातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २ ते ५ या वेळेत साडे येथील कोटीलिंग मंगल कार्यालय येथे सभा होणार आहे यावेळी साडे व कुंभेज गणातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत चिखलठाण नं १ येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे सभा होणार असून जेऊर गणातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. या सभांसाठी जगताप, चिवटे व बागल यांच्यासह आ. शिंदे उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत,असे भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले .