“सक्सेस” हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणा देणारे : श्रेणिकशेठ खाटेर.

करमाळा प्रतिनिधी सक्सेस’ या पुस्तकातुन नव्या पिढीला प्रेरणा मिळून प्रतिकूल परिस्थितीत कसं उभं रहावं आणि प्रगती करावी, याचं मार्गदर्शन मिळणार आहे. या पुस्तकाने आमच्या सारख्या प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळवणाऱ्या व्यक्तींनाही जीवन जगण्यात समाधान मिळाल्याची भुमिका या पुस्तकान दिलेली आहे; असे मत प्रसिध्द व्यापारी व समाजसेवक श्रेणिकशेठ खाटेर यांनी व्यक्त केले.
डॉ.ॲड.बाबूराव हिरडे लिखित ’सक्सेस’ पुस्तकाचे प्रकाशन श्री.खाटेर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवी प्रकाश लावंड हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, लेखक भीष्माचार्य चांदणे हे उपस्थित होते. पुढे बोलताना श्री.खाटेर म्हणाले, की जीवनामध्ये वाटचाल करत असताना दिशा देणारे लोक मिळाले तर प्रगती करणे सहज सोपे होते. आम्ही प्रतिकूल परिस्थितीत असताना ज्या अडचणी आल्या व त्या अडचणीवर मात करून कसे उभे राहिलो, हा आलेख या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आलेला आहे. नवयुवकांना हे पुस्तक म्हणजे नवसंजीवनी असून या पुस्तकाच्या वाचना नंतर प्रेरणा मिळून त्यांना स्वत:च्या जीवनात यश मिळवता येईल.
यावेळी यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील म्हणाले, डॉ.ॲड.हिरडे यांचे कार्य हे वेगवेगळ्या क्षेत्रात असून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आमची वाटचाल केली आहे. त्यातून जे आम्हाला यश मिळाले ते यश अलौकीक आहे. या पुस्तकाच्या माध्यामातून युवा पिढींना भविष्यात कसे उभे रहायचे, याचे ज्ञान होणार आहे. त्यामुळे हे पुस्तक इतर पुस्तकासारखे न समजता जीवनात यशस्वी होण्याचा ग्रंथ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
यावेळी लेखक भीष्माचार्य चांदणे म्हणाले, की यशस्वी जीवन जगण्यासाठी ’सक्सेस’ हे पुस्तक अत्यावश्यक आहे. आपल्या मातीतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व शुन्यातून यश मिळवणाऱ्या माणसाचे चरित्र वाचून नव्या पिढीला नवी दिशा मिळणार आहे. ॲड.हिरडे यांनी अतिशय विचारपूर्वक व दूरदृष्टी ठेवून या पुस्तकाची निर्मिती असल्याचे त्यांनी सांगितले.
सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी आपल्या भाषणात यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा आलेख हा निश्चितच दिशादर्शक ठरणार असल्याने हे पुस्तक करमाळा तालुक्याच्या इतिहासात दीपस्तंभ ठरणार असल्याचे सांगितले.लॉकडाऊनमुळे यावेळी हार, फुले यांचा वापर न करता समाजसेवक श्रेणिकशेठ खाटेर यांचे वतीने सर्वांना मास्कचे वाटप करून सन्मान करण्यात आला
सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कमलादेवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत सा.कमलाभवानी संदेशचे व्यवस्थापक डी.जी.पाखरे, ॲड.सचिन हिरडे, ॲड.संकेत खाटेर, वर्धमान खाटेर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन कवि खलील शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांनी मानले. यावेळी नगरसेविका संगीता खाटेर, तेजीबाई खाटेर, व्यापारी भारत(आण्णा) वांगडे, कांतीलाल संचेती, अभियंता सूरज हिरडे, ॲड.मांगले, भोलाशंकर परदेशी, स्वप्निल गायकवाड आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक कोठारी, गिरीष शहा, विजय बरीदे यांनी परिश्रम घेतले.
