हरीभाऊ हिरडे यांच्या आंब्यावानी व्हता गावं.कविता संग्रह मातीचा दस्ताऐवज-कल्पना दांगट पुणे
आंब्यावानी व्हता गावं.. (कविता संग्रह)
कधीकधी पुस्तकं वाचली जातात, तर काही पुस्तकं अनुभवली जातात.हरिभाऊ हिरडे यांच्या “आंब्यावानी व्हता गाव” या काव्यसंग्रहाचं वाचन हे केवळ एक साहित्यिक अनुभव न राहता,तो काळजाला भिडणारा, हृदयाच्या खोल कप्प्यात कुठेतरी नकळत साठून जाणारा प्रवास ठरतो.साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना या कविता संग्रहाच्या गाभ्यात शिरण्यापूर्वीच एक जिवंत दालन उघडते आणि वाचकाला सांगते .”इथे थांबावं लागेल, मनात जागा करून घ्यावी लागेल.”या ९६ पानी संग्रहात एकूण ५८ कविता आहेत.पण ही संख्या केवळ आकड्यांची नाही तर त्या ५८ जिवंत श्वास आहेत.गाव,माणसं,श्रम,वेदना,ओढ,विस्मृती आणि नात्यांची गुंफण,यांचा उत्कट प्रत्यय या कविता वाचताना सतत येत राहतो.यातले शब्द सजावट म्हणून वापरलेले नाहीत.ते रक्तातून आले आहेत,श्रमातून, मातीच्या मळवाटांमधून उगम पावले आहेत.कविता संग्रहाची सुरुवात “आई” या कवितेने होते आणि हेच संग्रहाचं वैशिष्ट्य.”आई महातीर्थ आहे” असं ठामपणे मांडताना कवी केवळ भावनेचा कळस गाठत नाही,तर आपल्या मुळाशी असलेल्या श्रद्धेचं आणि जगण्याच्या गाभ्याचं स्मरण करून देतो.ही कविता केवळ आईचं गौरव-गान न राहता, ग्रामीण माणसाच्या जगण्यातली आई ही संकल्पना किती मूलगामी आहे हे दाखवते.संग्रहाचं शीर्षक “आंब्यावानी व्हता गाव” हीच कविता शेतकऱ्यांच्या विस्थापनाच्या वेदनांवर अधोरेखित भाष्य करत जाते.
“उसा- कापसासकट
गाव गेलं चरख्यात
वेष घेवोनी कसाई
फिरत्याती गुराख्यात”
या ओळींमधून गाव हरवतंय,त्याच्या जडणघडणीच्या खुणा पुसट होत चालल्या आहेत हे अतिशय परखडपणे अधोरेखित केलं आहे.कवी कसलीही भूमिका न घेता, कोणतीही शैलीगत लयलूट न करता,सत्य मांडतो आणि हे सत्य इतकं पारदर्शक आहे की ते पचवताना वाचक अस्वस्थ होतो.”देवळे आणि पुतळे” ही कविता गावातली श्रद्धा आणि शहरातली भकास प्रतीकं यामधल्या फरकावर अत्यंत आशयगर्भ भाष्य करते.आज देवळांची संख्या वाढली तरी श्रद्धा कोरडी झाली आहे.गावात जळणारा दगडी दिवा आणि शहरातला निळसर उजेड यातला फरक दाखवत कवी एक मूलभूत प्रश्न विचारतो.आपण खरंच प्रगती केली आहे की फक्त पुतळ्यांच्या सावलीत विस्मरणाचं आक्रमण सहन करतो आहोत?”लोखंडाचा बाप” ही एक असाधारण कविता.बापाच्या व्यक्तिमत्त्वाचं लोखंडी स्वरूप मांडताना,कवी शेतातल्या नांगरटीचं प्रतीक वापरतो.पण त्याच वेळी तो सांगतो की,
“नांगरटीच्या कोणत्याच वळणावर
त्याला भेटला नाही कुठलाच परीस”
ही कविता वाचताना डोळ्यांत थिजलेलं पाणी नकळत गालांवर येतं.एका पिढीनं घेतलेली कष्टांची देणगी,त्यात मिळालेला निखळ खरेपणा पण त्याबरोबर आलेलं दुर्लक्षितपणही याचं प्रत्यंतर देणारी ही कविता संग्रहात एक विशेष स्थान राखते.
“घुंगर माळ आणि वासरू” या कवितेतून कवी ज्या संवेदनशीलतेने वासराच्या आईविना असहाय स्थितीचं वर्णन करतो,तीच संवेदना आज माणसांच्या मनातून हरवत चालली आहे,याची टोचणी लागते.
वासराच्या रवंथात जिवाची होणारी घालमेल माणसाच्या जगण्याइतकंच ठळक वाटतं आणि तेच कवीचं यश आहे.
या संग्रहातली भाषा सच्ची, साधी, पण प्रभावी आहे. उगीचच गूढ प्रतिमा,कलात्मक वळणं यांचा आहेर न करता,कवी आपल्या बोलीतूनच प्रभाव पाडतो.ही बोली माळरानावरून आलेली आहे,शेतमजुराच्या ओठांवरची आहे,उंबऱ्याच्या सावलीतून जन्मलेली आहे.म्हणूनच ती कवितांना अधिक खरंखुरं करते.कविता जात,धर्म,पंथ यांचे भिंती गडद करत नाहीत,उलट त्या विरघळवतात तिथेच ती कविता मोठी होते.या संग्रहातल्या कविता अशाच आहेत.त्या माणूस म्हणून विचार करायला लावतात.शेतकऱ्याचं दुःख, मातीशी नातं,गावाचं विस्मरण आणि पुढच्या पिढीला द्यावं असं काही तरी असावं या आकांक्षेतूनच या कविता जन्मतात.”शेतकरी गीत”, “गावची पायवाट”, “पूर्वजांची गेली पिढी”, “थोर अन्नदाता” अशा अनेक कवितांमधून शेतकऱ्याच्या जगण्याची धग आहे.ही धग केवळ शब्दांत नाही,तर आशयात आणि त्यामागच्या वास्तवात आहे.या संग्रहाची जडणघडण ‘कल्पनेतल्या ग्रामीण काव्यजगता’तून नाही,तर मातीच्या पायवाटांवरून आलेल्या धुळीतून झाली आहे.म्हणून या कविता कोणालाही स्वतःच्या कविता वाटतात.त्या आपण अनुभवलेल्या आहेत,कुठेतरी आपल्या आजूबाजूला घडलेल्या आहेत असं वाटतं.या संग्रहात कुठेही भाषिक अवघडपणा नाही. पांडित्याचा आभास नाही.पण ज्या सहजतेनं कविता मांडल्या आहेत,त्यामागं अनुभवांची परिपक्वता आणि वास्तवाचं व्रत आहे.संग्रहाचं नावच जणू एक शोकांतिका आहे .
“आंब्यावानी व्हता गाव” — म्हणजे जे कधी काळी फुललं, बहरलं, हसतं-खेळतं होतं ते आता कोरडं पडलंय, हरवलेलं आहे. हे शीर्षक फक्त एक कविता नसून,संपूर्ण संग्रहाचं प्रतीक आहे.शेवटी एवढंच म्हणता येईल की, “आंब्यावानी व्हता गाव” हा केवळ कवितांचा संग्रह नाही,तर तो मातीचा दस्तऐवज आहे.कवी हरिभाऊ हिरडे यांच्या लेखणीतून माणूसपण,श्रमसंस्कार आणि वास्तवाचं जे चित्र रेखाटलं गेलं आहे,ते कोणत्याही मोठ्या साहित्यिक वाड्:मयापेक्षा कमी नाही.हा काव्यसंग्रह वाचून विसरला जात नाही, तर वाचून अधिक अधिक मनात रुजत जातो.त्यातून कधी ओल येते,कधी रुखरुख, कधी चीड पण नेहमी काहीतरी जागं होतं.
ही कविता आहे मनात घर करून राहणारी.
ही कविता आहे माणूस बनवणारी.
ही कविता आहे,गाव शोधून पुन्हा जपायला शिकवणारी.
धन्यवाद, हरिभाऊ हिरडे सर.
ह्या कवितांनी गाव पुन्हा जिवंत झालं.
——–कल्पना आण्णासाहेब दांगट
पुणे
Mb no.7350607422


