करमाळा

उजनी जलाशयाच्या ढोकरी येथील काठावर सृजनांची मैफील तुफान रंगली

करमाळा ( दि – 16.)देशप्रेमाने भारलेली गीतं , अप्रतिम आवाजातील महाराष्ट्र गीत, सामाजिक व्यंगावर आसूड ओढणारे एकनाथांच भारूड , उत्कट प्रेमाची घालमेल उघड करणारं स्पंदनं , राजकारणातील संगीत खुर्चीवर तिखट मारा करणारी वास्तव कविता , बासरीचे सुमधूर स्वर, सौर उर्जैवर चालणार्या अनोख्या बोटीतून मारलेली उत्साह वाढवणारी सफर आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी केलेली शैलीदार, अभ्यासपूर्ण भाषणं , यांनी उजनी जलाशयाच्या ढोकरी येथील काठावर सृजनांची मैफील तुफान रंगली . .साथीला होता बंडगर वस्ती येथील उजनी जलाशयाचा शांत ,विस्तीर्ण, विहंगम परिसर आणि उजनी धरणग्रस्तांच्या त्यागातून बहरलेली हिरवी सम्रुद्ध शेती !
निमीत्त होते स्वातंत्र्य दिनाचे ! सृजनांच्या स्नेह मेळाव्याचे !

उजनी धरणाच्या काठावरील ढोकरी तालुका करमाळा येथील बंडगर वस्ती येथे स्वातंत्र्यदिनी करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या सृजनांचा स्नेह मेळावा जिव्हाळा समुह , करमाळा साहित्य मंडळ ,ग्रामसुधार समिती व ढोकरी ग्रामस्थ यांनी आयोजित केला होता. वैचारिक प्रबोधन, कविता ,भारुड ,भावगीते ,भक्तीगीते,देशप्रेम, जुन्या चित्रपटातील सदाबहार गीते , याबरोबरच तालुक्याच्या व परिसराच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकी जपत गट, पक्ष भेद विसरून एकत्र येऊन कार्य करण्याचा संकल्प करत पाच तास रंगलेल्या कार्यक्रमानंतर पुन्हा भेटण्याचा दिवस ठरवत प्रत्येकाने घेतला एकमेकांचा निरोप.तेव्हा प्रतेकाच्या चेहर्‍यावर आनंद साचलेला होता.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ग्राम सुधार समिती करमाळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील कला ,साहित्य, राजकीय ,सामाजिक ,शेती ,उद्योग, पर्यावरण, क्षेत्रात कार्य करणाऱ्या निवडक सृजनांचा मेळावा बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांच्या शेतात उजनी धरणाच्या काठावर आयोजित करण्यात आला होता .
दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला निवांतपणे एकमेकांशी बोलण्यासाठी , चर्चा करण्यासाठी ,आपले छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागतो आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन ॲड डॉ बाबुराव हिरडे यांच्या संकल्पनेतून उजनी धरण काठावर हा कार्यक्रम संपन्न झाला.
यामध्ये तालुक्यातील जेष्ठ कवी प्रकाश लावंड ,नवनाथ खरात, खलील शेख ,विवेक पात्रुडकर, नितीन तकिक यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने यांनी सुमधुर बासरी वादन केले ,जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र रणसिग यांनी भारुड सादर केले. शिक्षक लष्कर गुरुजी यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर काही भावगीते, भक्ती गीते, सादर करत या कार्यक्रमांमध्ये रंग भरला .
आदिनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी तालुक्यातील शेती क्षेत्राची सद्यस्थिती तील बलस्थाने ,संधी व आव्हाने या विषयी मार्गदर्शन केले ,आजिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, उदयसिंह मोरे पाटील यांनी अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अनिल माने यांनी चळवळीच्या गीतातून समाज जीवनातील वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न केला . सेवानिवृत्त मुख्याध्यापक निवृत्ती सुरवसे, गंगाराम वाघमोडे यांनी शैक्षणिक क्षेत्रामधील बदलांबद्दल विचार व्यक्त केले. वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके यांनी परिसरातील समस्येबाबत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे संयोजक प्रा .शिवाजीराव बंडगर यांनी सोलापूर सह तीन जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाची सद्यस्थिती व धरणग्रस्तांच्या अडचणी व याबाबत करायाच्या उपायोजनांची गरज व्यक्त केली व तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

समारोपाच्या भाषणामध्ये डॉ. बाबुराव हिरडे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांची विविध क्षेत्रांमध्ये होत असलेली मुस्कटदाबी व यासाठी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली तर अशा प्रकारच्या वारंवार बैठका आयोजित करून जनजागृती करत एकत्रित कार्य करण्याचे आवाहन केले .भारतराव साळुंखे, मंगेश जगताप यांचीही समयोचित भाषणे झाली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार अर्जुन तकिक यांनी मानले . या कार्यक्रमाला भाजपा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष मकाई कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ ,संचालक गणेश तळेकर, शिवराज रोकडे ,भारत रोकडे ,आदिनाथचे संचालक श्रीमंत चौधरी , तानाजीराव देशमुख, भारतराव साळूंके,नाथाजीराव शिंदे बाळासाहेब टकले ,अंगद देवकाते, ढोकरीचे सरपंच दत्ता खरात ,माजी सरपंच किरण बोरकर ,भारत सलगर, देविदास पाटील ,महादेव वाघमोडे ,भिवरवाडी चे सरपंच भाऊसाहेब शेळके ,भजन सम्राट अंगद सांगवे ,माजी उपसरपंच कुंडलिक गडदे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खरात ,अनिल आरकिले , तात्यासाहेब सरडे, भागवत पाटील, काका पाटील ,बालाजी मंगवडे, पांडुरंग गडदे ,विलास लबडे ,प्रशांत नाईक नवरे ,नानासाहेब साळुंके ,विजय लबडे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती उपस्थितांचे स्वागत भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, आदित्य बंडगर आशिष बंडगर, महादेव बंडगर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप वाघमोडे ,साईनाथ बोरकर माऊली सलगर ,अर्जुन चौगुले ,अमोल गडदे, प्रताप आरकिले ,संजय सांगवे, बाबासाहेब चौगुले ,चैतन्य पाटील आदींनी प्रयत्न केला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!