कोरोना महामारीच्या संकटकाळात सार्वजनिक गणेशोत्सवाला बसला ब्रेक शहरात 9 तर ग्रामीण भागात 34 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली : घरोघरी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना*.

प्रतिनिधी राजाराम माने श्रावण महिना संपताच गणरायाच्या आगमनाची
चाहूल लागते बालगोपाळासह तरुण मंडळींना गणरायाचे आकर्षण असते मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट तसेच प्रशासनाच्या नियम, अटी व बंधने असल्याने दरवर्षीप्रमाणे मंडप उभारणी,डेकोरेशन,देखावे,आरास, गुलालाची उधळण, मिरवणुका,डॉल्बी यासाठी असणाऱ्या लगबगीला पूर्णपणे ब्रेक बसला आहे. श्रीगणेशाची वाजत गाजत काढण्यात येणारी मिरवणूक यंदाच्या वर्षी न काढता आल्याने बॅन्डवाले ,हलगीवाले ,ढोलताशा पथक यावर अवलंबून असणाऱ्यांना यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले असुन कोरोनामुळे गणेशोत्सव काळात चांगली कमाई होत असलेल्या यावर उदरनिर्वाह असणाऱ्या व्यावसायिक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे . यंदाच्या वर्षी अतिशय साध्या पद्धतीने गणरायाच्या मूर्ती आणून घरोघरी गणेशाची स्थापना होताना दिसून आली.यावेळी देश तसेच जगावर आलेल्या कोरोना महामारीचे संकट हे विघ्नहर्ता तूच दूर कर अशी आर्त साद गणेशभक्तांनी गणराया पुढे घातली.
ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या लाडक्या गणेशमूर्ती विक्रेत्याकडून खरेदी केल्या गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात व त्याची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी बहुतांश नागरिकांची लहान मूर्तीनाच पसंती होती असे दिसून आले दरवर्षी मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा होणारा हा सण उत्सव यावर्षी मात्र अतिशय साध्या पद्धतीने साजरा होताना दिसून आला. करमाळा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागांतील बहुतांश
तरुण मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे टाळले आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांनुसार करमाळा शहरामध्ये 9 तर ग्रामीण भागात 34 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले .शहरातील नागरिकांनी गणेश मूर्ती कुठलाही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने घरोघरी नेण्यात आल्या व त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली .यावेळी बच्चेकंपनीचा उत्साह मात्र दांडगा होता. एकूणच कोरोनाचे संकट असली तरीही श्री गणेशा प्रति असलेल्या भक्तीमुळे प्रतिष्ठापनेचा उत्साह मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे.
