करमाळा

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व सातत्य अंगी जोपासून कृषि उद्योजक बनावे: श्री. दिपक देशमुख*

 

*कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील कृषि पदवीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

करमाळा प्रतिनिधी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती व्यवसायात खूप अडचणी भेडसावतात, परंतु शेतकऱ्यास या सर्व प्रश्नांवर मात करुन पुढे जावे लागते. सर्व विद्यार्थी भाग्यवान आहात की तुम्हांस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यास प्रवेश मिळालेला आहे. परंतु शेतीकडे व्यावसायिक माध्यमातून बघणे ही आज काळाची गरज झालेली आहे, त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून सर्व विद्यार्थ्यानी आपले शिक्षण घ्यावे व कृषि उद्योजक बनावे, असे प्रतिपादन यशस्वी दुग्ध उद्योजक व लोकविकास डेअरी, वांगी, ता. करमाळा येथील चेअरमन श्री, दिपक देशमुख यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव ता. जामखेड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये कृषि पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीक्षारंभ कार्यक्रमात श्री. दिपक देशमुख प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतीस दुय्यम व्यवसायाची जोड देणे गरजेचे आहे. त्यामध्ये दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम उद्योग इत्यादींचा समावेश आहे. बहूपिक पद्धतीचा अवलंब करावा म्हणजे एक पिकात झालेले नुकसान दुसऱ्या पिकात भरून निघते.

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सर्व उपक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक, मैदानी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना मोठे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन त्यादृष्टिने कष्ट करावे, त्यात सातत्य ठेवावे व यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा दरम्यान प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी आपला परिचय उपस्थित मान्यवरांना करून दिला. सदर कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे नव्याने प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी, हाळगाव व जवळा गावातील प्रगतशील शेतकरी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉ. दीपक वाळुंजकर इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोकूळ वामन यांनी केले. प्रमुख अतिथीची ओळख डॉ. उत्कर्षा गवारे यांनी करुन दिली. सूत्रसंचालन डॉ. प्रणाली ठाकरे तर अर्चना महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!