करमाळा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटेंवर हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

करमाळा प्रतिनिधी: शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर एका युवकाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास हिवरवाडी रोडवरील कॅनॉलजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी मनोज उर्फ आकाश संजय लांडगे (रा. मांगी, ता. करमाळा, हल्ली रा. हिवरवाडी, ता. करमाळा) याला ताब्यात घेतले आहे.

महेश चिवटे हे आपल्या हिवरवाडी येथील फार्म हाऊसवरून त्यांच्या कारमधून ७:४५ वाजता घराकडे निघाले असताना कॅनॉल रोडवर एका युवकाने त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावून त्यांना अडवले. ‘तू बागलांच्या विरोधात राजकारण का करतोस?’ असे म्हणत संशयिताने ‘तू बागलांची माफी माग’, असे म्हणून हातात गावठी कट्टा धरून धमकावत काठी व हाताने मारहाण केली. मनोजने रश्मी बागल व दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे चिवटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजित माने त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चिवटे यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!