करमाळा

जिद्द, चिकाटी आणि सबुरीतूनच यशाचा मार्ग – संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी: जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास जिद्द, चिकाटी, श्रद्धा आणि सबुरी या चार गुणांचा आधार असणे आवश्यक असून, सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात करमाळा नगरसेवकपदी दिपक चव्हाण आणि करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया प्रमुख गणेश कराड आणि प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नासीर कबीर. याशिवाय भाजपचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, भाजप युवा मोर्चाचे मनोज कुलकर्णी, तसेच स्थानिक उद्योजक शुभम कुलकर्णी, संतोष कांबळे उपस्थित होते.
सत्कारादरम्यान भाजप युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस आणि नगरसेवक दिपक चव्हाण तसेच पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, राजकारण आणि समाजकारणात अनेक अडचणी येतात; परंतु ध्येयावर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते. श्रद्धा ठेवणे आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची सबुरी आवश्यक आहे. दिपक चव्हाण आणि दिनेश मडके यांचे यश अचानक मिळालेले नाही, तर त्यांच्या दीर्घकालीन संघर्ष, मेहनत आणि सातत्यपूर्ण कार्याचे फलित आहे. त्यामुळे तरुण पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर यांनी दिपक चव्हाण यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. प्रामाणिक कार्यकर्त्याला जनतेने नगरसेवकपदी संधी दिली, ही समाधानाची बाब असून, नगरसेवकपदाच्या माध्यमातून दिपक चव्हाण करमाळा शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावतील आणि शहराचा चेहरामोहरा बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात भाजपचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर आणि सोशल मीडिया प्रमुख गणेश कराड यांनीही दिपक चव्हाण यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना दिपक चव्हाण यांनी सांगितले, “करमाळा नगरसेवकपदी मला जनतेने निवडून देऊन काम करण्याची संधी दिली आहे. नक्कीच मी हे सोने करून दाखवेल आणि माझा कार्यकाल जनतेच्या मनामध्ये राहील. प्रभागाबरोबरच करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण काम करणार असून आपले मार्गदर्शन सहकार्य आशिर्वाद सदैव पाठीशी राहू द्या असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले, तर आभारप्रदर्शन मनोज कुलकर्णी यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!