करमाळा

डॉ.रोहन पाटील यांना समाजसेवा व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जागतिक संसदीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मान

.
करमाळा  प्रतिनिधी
करमाळा येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रोहन पाटील यांना समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल जागतिक संविधान व संसदीय संघटना (WCPA – World Constitution and Parliament Association) यांच्यावतीने “जागतिक संसदीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार – २०२५” जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या वैद्यकीय सेवेतील निष्ठा, मानवतावादी दृष्टिकोन आणि समाजकल्याणासाठी केलेल्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन देण्यात येत आहे.
१९५८ साली अमेरिकेत स्थापन झालेली WCPA ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली संस्था असून, पृथ्वीच्या संघराज्यासाठी संविधानाची निर्मिती, प्रसार व प्रायोजन हे तिचे मुख्य कार्य आहे. “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वावर आधारित पृथ्वी संविधानाच्या माध्यमातून जागतिक शांतता, अहिंसा, मानवी हक्कांचे संरक्षण, लोकशाही मूल्यांची जपणूक तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत आहे. मानवी मूल्ये, सामाजिक स्थैर्य आणि जागतिक सलोखा प्रस्थापित करणे हे WCPA चे प्रमुख उद्दिष्ट आहे.
डॉ. रोहन पाटील हे एम.बी.बी.एस., एम.डी. (फिजिशियन) आणि एफ.सी.पी.एस. (मेडिसिन) पदवीधर असून, त्यांनी करमाळा तालुका तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्पदंश व विषप्राशन झालेल्या रुग्णांवर अत्यंत यशस्वी उपचार करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची ओळख ‘सर्पदंश रुग्णांचे देवदूत डॉक्टर’ अशी झाली आहे.
वैद्यकीय व्यवसायाबरोबरच समाजसेवेची परंपरा त्यांनी आपले वडील स्वर्गीय प्रदीप आबा जाधव पाटील यांच्याकडून जपली आहे. गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. आई कमला भवानी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून करमाळा शहर व तालुक्यात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून अल्पदरात उपचार, तपासण्या व मार्गदर्शन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
या पुरस्काराची घोषणा WCPA चे जागतिक अध्यक्ष प्रा. डॉ. ग्लेन टी. मार्टिन (USA) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी WCPA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघवे (अध्याय – श्रीरामपूर) उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. रोहन पाटील यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
डॉ. रोहन पाटील यांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान करमाळा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे. त्यांच्या कार्यामुळे वैद्यकीय आणि समाजसेवा क्षेत्रातील तरुण पिढीला निश्चितच प्रेरणा मिळत असून, स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या गौरवामुळे करमाळा तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचा जागतिक पातळीवर नावलौकिक झाला असून, डॉ. रोहन पाटील यांच्या कार्याची ओळख आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ठळकपणे होत आहे.या प्रसंगी पुरस्कार सत्कारमूर्ती डॉ रोहन पाटील व त्यांच्या पत्नी सौ शिवांजली रोहन पाटील यांचा सत्कार करताना पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संजयकुमार राजेघोरपडे, जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव,संतोष गोरे,सौ व श्री,राजाभाऊ महाडिक,पोलीस मित्र Resistance महिला राज्य संपर्क प्रमुख सौ स्वाती मोरे मॅडम या पोलीस मित्र संघटनेच्या परिवारातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला या संघटनेचे राज्य संघटक विष्णुपंत आंधळकर यांनी उभयतांना हार्दिक शुभेच्छा दिल्या,पोलीस मित्र संघटना सर्वांना सहकार्यासाठी हातभार लावण्यासाठी नेहमी तत्पर राहील असे आश्वासन अमोल जाधव यांनी दिले
श्री व सौ पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,या प्रसंगी डॉक्टर घरबुडे व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!