करमाळ्याचे साहित्यिक भीष्माचार्य चांदणे सर यांना स्व. शिवाजीराव डिसले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक श्री भीष्माचार्य चांदणे यांना सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शी यांचा प्रतिष्ठेचा स्वर्गीय शिवाजीराव डिसले स्मृति गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या शुभहस्ते वैराग येथे देण्यात आला..
त्यावेळेस मंचावर त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी प्रवीण बिनवडे, श्री संदीप निर्मळ, श्री विश्वनाथ चव्हाण व किरण कुलकर्णी उपस्थित होते.त्याचबरोबर श्री प्रताप दराडे, अध्यक्ष श्री रवि कापसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री भीष्माचार्य चांदणे यांनी आता पर्यंत विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन केलेले आहे. त्यांच्या कथा आणि कविता नामांकित दिवाळी अंकातून तसेच सत्याग्रही विचारधारा यासारख्या प्रतिष्ठित मासिकातून वेळोवेळी प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे सद्यस्थितीवरील तसेच शिक्षणावरील लेख महाराष्ट्रभर वायरल झालेले आहेत.या साऱ्या लेखनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यातून सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने त्यांची साहित्य पुरस्कारासाठी निवड केली.”जंगलात फुले उमलतात, बहरतात,फुलतात…. त्यांची प्रशंसा करायला कोणी असो वा नसो त्यांचे ती फुलत राहतात झुलत राहतात.. त्याचप्रमाणे माझी ही साहित्य सेवा चालू होती. पण सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने पाठीवर पुरस्काराची थाप देऊन लेखन करण्यासाठी मला एक नवीन ऊर्जा दिली.” या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांनी जिल्ह्यातील अशाच एकाकी साहित्य सेवा करणाऱ्या दर्जेदार साहित्यिकांना समर्पित केलेला आहे.


