मराठा सेवा संघाच्या वतीने दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा .रामदास झोळ यांना ‘मराठा शिक्षणभूषण’ पुरस्काराने सन्मान
करमाळा प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टी येथे मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा शुक्रवारी (दि. ८) करण्यात आली. समाजजीवनातील शिक्षण, कृषी, क्रीडा, सायबर सुरक्षा आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी जिजाऊ जयंतीदिनी सिंदखेडराजा येथे प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाचा मानाचा ‘मराठा शिक्षणभूषण पुरस्कार’ शिक्षण क्षेत्रात सामाजिक परिवर्तनासाठी भरीव योगदान देणारे प्रा. रामदास मधुकर झोळ यांना जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण हे समाजबदलाचे प्रभावी साधन मानून त्यांनी जिजाऊ–शिवराय–महात्मा फुले–राजर्षी शाहू महाराज–डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगत विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
प्रा. झोळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध शैक्षणिक समित्यांवर कार्य करत विद्यार्थीहिताचे अनेक धोरणात्मक निर्णय प्रत्यक्षात आणले. सोलापूर जिल्ह्यातील वाशिंबे येथून त्यांनी आपल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची सुरुवात केली. विशेषतः मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमाची कालमर्यादा तीन वर्षांऐवजी दोन वर्षे करणे, शिष्यवृत्ती व सवलतींच्या कक्षेत अधिकाधिक अभ्यासक्रमांचा समावेश करून घेणे, तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृह भत्त्यात वाढ करून घेणे या निर्णयांमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
याशिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्युएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त प्रवेश जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी माजी खासदार शरदचंद्रजी पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतजी पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांमुळे ईडब्ल्युएस प्रवर्गातून अतिरिक्त प्रवेश जागा उपलब्ध झाल्या. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशपात्रता शिखर संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित करणे, तसेच ईडब्ल्युएस प्रवर्गातील प्रथम वर्षातील रिक्त जागा दुसऱ्या वर्षाच्या लॅटरल एन्ट्रीसाठी उपलब्ध करून देणे यासारख्या निर्णयांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रदान करण्यात आला होता.
दरम्यान, सायबर सुरक्षा व सायबर साक्षरता या क्षेत्रात व्यापक व समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल पुणे येथील कैलास साहेबराव काटकर यांना ‘मराठा विश्वभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. डिजिटल युगात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करत सुरक्षित इंटरनेट वापरासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
भारतीय अंध महिला टी-२० क्रिकेट संघाच्या उपकर्णधार म्हणून संघाला विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल गंगा संभाजीराव कदम यांना ‘जिजाऊ पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या यशामुळे दिव्यांग खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
शेती क्षेत्रात संशोधन, प्रयोगशीलता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी केलेल्या कार्याबद्दल शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख यांना ‘मराठा कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच, दृष्टीबाधित असूनही जलतरण व क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रितेश राजेंद्र केरे यांना ‘मराठा क्रीडाभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊ सृष्टी येथे हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून नव्या पिढीला प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मराठा सेवा संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


