Monday, February 23, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा येथील प्रसिद्ध व्यापारी यश कलेक्शनचे मालक राजकुमार दोशी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा*

*
करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील नामांकित उद्योजक तथा यश कलेक्शनचे मालक सर्वेसर्वा राजकुमार दोशी यांचा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी तसेच आनंदी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. व्यावसायिक यशासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणाऱ्या दोशी यांनी वाढदिवसानिमित्त अन्नदान व गोसेवा उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
गेल्या सुमारे ४० वर्षांपासून करमाळा शहरात प्रामाणिकपणे व जिद्दीने व्यवसाय उभारणारे दोशी हे विश्वासार्ह उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली यश कलेक्शनने गुणवत्ता, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकाभिमुख सेवा या तत्त्वांवर भक्कम वाटचाल केली आहे. त्यांच्या उद्योगसमूहामुळे सुमारे १५० कुटुंबांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला असून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला आधार मिळाला आहे. यश कलेक्शनच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने राजकुमार जोशी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व पांजरपोळ गोशाळेत गायींसाठी चारा देऊन गोसेवा करण्यात आली. तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘अन्नपूर्णा’ योजनेअंतर्गत निराधार व गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमात प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कर्मचारीवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजकुमार दोशी म्हणाले, “व्यवसायातून मिळणाऱ्या यशामागे समाजाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे समाजासाठी काहीतरी परत देणे ही आपली जबाबदारी आहे.” त्यांच्या या विचारांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सामाजिक उपक्रमांनी दिवसाची सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दोशी यांनी आपल्या नातवंडांसमवेत केक कापत वाढदिवसाचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
या प्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी अश्विनी दोशी, चिरंजीव यशराज दोशी व प्रतिक दोशी, दोन्ही सुना, बंधू अशोक दोशी व त्यांची मुले अभिजीत अमोल सहपरिवार उपस्थित होते. सर्व कुटुंबीयांनी त्यांना शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यशासाठी शुभेच्छा दिल्या. घरामध्ये आनंदी व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. करमाळा नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष प्रतिनिधी नगरसेवक संजय सावंत उपनगराध्यक्ष अतुल फंड यांनी त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांनी संघटनेच्यावतीने राजकुमार दोशी यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
व्यवसायातील प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्य यांच्या जोरावर राजकुमार दोशी यांनी करमाळ्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा यांचा सुंदर संगम साधत त्यांचा वाढदिवस यंदा संस्मरणीय ठरला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!