Tuesday, February 24, 2026
Latest:
करमाळा

करमाळ्यात मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील व्याज-दंड पूर्ण माफीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संजय बापु घोलप यांचे नगरपरिषदेला निवेदन

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील सर्व मालमत्ताधारकांच्या थकीत तसेच चालू मालमत्ता कर व पाणीपट्टीकर बिलावरील व्याज आणि शास्ती (दंड) पूर्णपणे माफ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष संजय बापु घोलप यांनी केली आहे. याबाबत मा. मुख्याधिकारी, करमाळा नगरपरिषद यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय क्र. एमयूएम २०२५/प्र.क्र.७०/नवि-२७ दि. १९ मे २०२५ अन्वये थकीत करावरील व्याज व शास्ती माफ करण्याबाबत तरतूद केली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातही तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे घोलप यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपरिषद यांनी यासंदर्भात पुढाकार घेत नगरपरिषदेच्या सभेत ठराव मंजूर करून प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हा यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा लाभ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याच धर्तीवर करमाळा नगरपरिषदेतही विषय सभेपुढे मांडून मंजुरी घ्यावी व पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्याज व दंड माफीची योजना राबविल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली करथकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल होऊ शकते. अनेक नागरिक केवळ वाढलेल्या व्याज-दंडामुळे कर भरण्यास टाळाटाळ करतात. मूळ कररकमेवर भर देण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास संजय बापु घोलप यांनी व्यक्त केला आहे.
या निर्णयामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्याबरोबरच नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल. नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर सर्वसाधारण सभेत विषय मांडून शासन निर्णयानुसार आवश्यक ठराव मंजूर करावा व प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!