Wednesday, March 4, 2026
Latest:
करमाळा

करमाळ्यात ‘महाराजस्व अभियान’ ७ मार्चपासून; ११ महसूल मंडळांत गावपातळीवर शिबिरे सातबारा, रेशन, ई-केवायसीसह विविध कामांचा ऑन-द-स्पॉट निपटारा होणार -तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा  तालुक्यातील नागरिकांची शासकीय कामे सुलभ व जलद गतीने मार्गी लावण्यासाठी महसूल प्रशासनाकडून ‘महाराजस्व अभियान’ हाती घेण्यात आले आहे. ७ मार्च ते १५ मे या कालावधीत करमाळा तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, विविध विभागांचे अधिकारी गावपातळीवर उपस्थित राहून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा ऑन-द-स्पॉट निपटारा करणार आहेत.
तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्यांमुळे होणारा वेळ व पैशांचा अपव्यय टाळणे आणि सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरांमध्ये सातबारा दुरुस्तीअंतर्गत वारस नोंदी करणे, पोटखराबा क्षेत्र व तुकडेबंदी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करणे, तसेच रेशन कार्डमधील नावे कमी-जास्त करणे आदी कामांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करून घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या प्रलंबित मदतीसाठी पाठपुरावा करणे, फार्मर आयडी काढून देणे आणि ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेअंतर्गत सातबारावर महिलांचे नाव नोंदविणे ही कामेही शिबिरात करण्यात येणार आहेत.
अभियानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक गावातील व्हॉट्सअॅप गट सक्रिय करण्यात आले आहेत. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मशिदींमधील ध्वनिक्षेपकाद्वारेही शिबिरांची माहिती देण्याची विनंती संबंधित मौलवींना करण्यात येणार आहे.
“शासकीय यंत्रणा तुमच्या दारी येत आहे. ७ मार्च ते १५ मेदरम्यान आपल्या महसूल मंडळातील शिबिराच्या तारखा जाणून घेऊन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घ्यावा,” असे आवाहन तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे यांनी केले आहे.
या अभियानामुळे करमाळा तालुक्यातील महसूल विषयक कामांना गती मिळणार असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!