जागतिक महिला दिनानिमित्त करमाळ्यात ‘सखी मेळावा’; महिलांसाठी विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन– नगरसेविका श्रीमती निर्मलाताई गायकवाड
करमाळा प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त करमाळा नगरपरिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘सखी मेळावा’ अंतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती करमाळा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका श्रीमती निर्मलाताई गायकवाड यांनी दिली.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. करमाळा शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि या उपक्रमाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन नगरसेविका श्रीमती गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमांतर्गत दि. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत विकी मंगल कार्यालय, करमाळा येथे संगीत खुर्ची व बकेटमध्ये बॉल टाकणे या मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमुळे सहभागी महिलांना आनंददायी वातावरणात स्पर्धात्मक अनुभव मिळणार आहे.
दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत त्याच ठिकाणी पाककृती स्पर्धा व उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमधून महिलांच्या पाककला कौशल्याबरोबरच सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणार आहे.
दि. ११ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत विकी मंगल कार्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमात महिलांकडून विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार असून स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
प्रत्येक स्पर्धेतून प्रथम तीन विजेते निवडण्यात येणार असून त्यांना ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे प्रदान केली जातील. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांनाही विशेष गिफ्ट देण्यात येणार आहेत.
या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू असून इच्छुक महिलांनी तुषार टांकसाळे (मो. ९९६०२३६५७१), अश्विनी जाधव (मो. ७९७२८४७२०९), शितल बहाड (मो. ९१७२४२३३५१) आणि सुप्रिया पालखे (मो. ७९७२६५०५०८) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेविका श्रीमती निर्मलाताई गायकवाड यांनी केले आहे.


